सांगली : सांगलीच्या जत (Sangali jat) तालुक्यातील पांडोझरी-बाबरवस्ती जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे (Teacher dilip waghmare) यांची आंतरजिल्हा बदली झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक भावूक झाल्यामुळे याची सगळीकडे चर्चा आहे. गुरुजींच्या भोवती मुलं फिरत होती, ‘गुरुजी तुम्ही जाऊ नका.’ त्याचबरोबर विनवण्या सुध्दा करीत होती. हे सगळं पाहून पालकांचे डोळे पाणावले. शिक्षकाची श्रीमंती विद्यार्थ्यांच्या प्रेमावर व मायेवर असते ते या घटनेने दिसून आलं आहे. अनेकदा शिक्षकाची (education news) बदली झाल्यानंतर अशा पद्धतीचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मुलाचं शिक्षकाप्रती असलेलं प्रेम खूप काही सांगून जातं.
जत पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक द्विशिक्षिकी वस्ती शाळेत दिलीप वाघमारे हे जून २०११ पासून शिक्षक म्हणून काम करत होते. तेथे काम करत असताना त्यांनी सह-शालेय उपक्रम, पालक भेटी,शैक्षणिक उठाव उपक्रम, पालक संपर्क, शैक्षणिक जागृती असे उपक्रम राबवले व विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली. गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शैक्षणिक दर्जा चांगलाचं उंचावला. त्यांनी चांगलं काम केल्यामुळे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळाला आहे. त्यांनी मुलांना शिक्षण देत असताना अधिक जीव लावल्यामुळे मुलं रडली.
वस्तीवरील ४० कुंटुंबे व्यसन मुक्त करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. ज्ञानरचनावाद, बोलक्या भिंती, वृक्ष लागवड व संगोपन हे उपक्रम ही त्यांनी तिथं राबविले आहेत. अशा या धडपडी व उपक्रमशील दिलीप वाघमारे गुरुजी यांची नांदेडला बदली झाली. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शाळेत निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ अतिशय भावूक झाले होते. मुलांच्या मनात गुरुजींच्या बद्दल आदर प्रेम भावना असल्याने निरोपावेळी सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.