शंकर देवकुळे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, सांगली | 10 डिसेंबर 2023 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊसदरावरून आक्रमक झाले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार राज्य सरकारने बघायची भूमिका घेऊ नये लवकरात लवकर ऊसदराचा तिढा सोडवा. जर तसा निर्णय झाला नाही. तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही कठोर शब्दात टीका केली आहे.
जयंत पाटील यांचं नाव घेण्याची वाईट वेळ माझ्यावर अजून आलेली नाही. आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे जयंत पाटील यांनी बघावं. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी लढतोय. त्यांच्यासाठी टाहो फोडतोय, असं म्हणत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत वसंतदादा साखर कारखाना प्रणित दत्त इंडिया इथं जात काटा बंद आंदोलन करत आहेत. सध्या या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे. इथं टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अद्याप कायम आहे. ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्या समोर काटा बंद आंदोलन करण्यात येतंय. ऊस दराबाबत कोल्हापूर पॅटर्न सांगली जिल्ह्यात ही सर्व साखर कारखान्यांनी राबवावा, अशी प्रमुख मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
ऊस दरावरून सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. हे कार्यकर्ते सर्व वसंतदादा साखर कारखान्याच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये यांच्या जोरदार बाचाबाची सुरू आहे. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.ऊसाला योग्य भाव मिळत नाही तोवर मागे हटणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.