राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवारांच्या स्वागतासाठी भव्य रॅली निघाली. सांगलीच्या कवठेमहांकाळ भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रोहित आर. आर.पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. कवठेमहांकाळ शहरातील प्रमुख मार्गावरुन ही रॅली निघाली. प्रचंड जयघोष करत दुचाकीसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर शरद पवार यांनी सभेला संबोधित केलं. तेव्हा आर. आर. पाटील यांचा दाखला पवारांनी दिला.
माझी निवड 100 टक्के खरी ठरली आणि आर आर पाटील यांनी ग्रामविकासमध्ये चांगले काम केले. आणि त्यानंतर त्याच्या कडे गृहखातं दिलं. आता ते निघून गेले आणि महाराष्ट्र हळवा झाला. पण रोहित याची कमतरता भरून काढेल. मी महाराष्ट्रमध्ये फिरतोय. लोकांच्यात फिरतोय. लोकांचं म्हणणं आहे की, महाराष्ट्रामध्ये परिवर्तन पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी सत्ता हातात आल्यानंतर सत्ता डोक्यावरून गेली आहे. ती खाली आणायची आहे, असं विधान शरद पवार यांनी केलं.
माझी इच्छा होती दुष्काळी भागात जायची आणि मी सांगलीला आलो. 10 वर्षापूर्वी आमचा सहकारी निघून गेला. त्याच्यामध्ये कर्तृत्व होते. निर्णय घ्यायची दृष्टी आणि ताकत होती. त्या व्यक्तीचे नाव आर. आर. पाटील. मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आर आर पाटील होते. त्यांना पाहिले आणि हे नाणं खणखणीत आहे असे वाटले. आणि राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं, असं म्हणत पवारांनी आर. आर. आबांच्या आठवणींना उजाळा दिला.
कवठेमहांकाळमधील या सभेत रोहित पाटील यांनी भाषण केलं. भाषण दरम्यान रोहित पाटील भावनिक झाले. त्यांचे डोळे पाणावले. महांकाली साखर कारखाना चालू झाल्यास शेतकरयांचा फायदा होणार आहे. शरद पवार साहेबांनी महांकाली साखर कारखाना सुरू करून देण्याची भूमिका घ्यावी. एमआयडीसी होऊ नये म्हणुन समाजकंटकांनी विरोध केला. योगेवाडीतील एमआयडीसी मंजूर झाली. लोकसभेच्या 3 महिने आधी एमआयडीसी मंजूर झाली. एमआयडीसाठी आता पाणी आरक्षण मंजूर झालं आहे, असं यावेळी रोहित पाटील म्हणाले.