सांगलीच्या जागेवरून मविआतील तिढा वाढला; विशाल पाटलांच्या ‘त्या’ पत्राने चर्चांना उधाण

| Updated on: Apr 06, 2024 | 11:27 AM

Vishal Patil Latter To Congress Activist about Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसकडून इच्छूक असणारे उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलं आहे. वाचा...

सांगलीच्या जागेवरून मविआतील तिढा वाढला; विशाल पाटलांच्या त्या पत्राने चर्चांना उधाण
विश्वजीत कदम. विशाल पाटील
Follow us on

पश्चिम महाराष्ट्रातील एक मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ… सांगलीच्या जागेवरून सध्या प्रचंड चर्चा होतेय. काँग्रेसचं प्राबल्य असणाऱ्या या जागेवर ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी दिली आहे. पण या जागेवर काँग्रेस आधीपासूनच दावा करत आहे. लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांचे काँग्रेस नेते, पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्या या पत्राची मतदारसंघात चर्चा होत आहे. सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीतला तिढा वाढणार आहे. या पत्राच्या माध्यमातून विशाल पाटलांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांना पत्र लिहित विशाल पाटलांनी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे.

विशाल पाटील यांचं पत्र जसंच्या तसं

मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.

स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मा. विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत.

या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे कि, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू….

आपलाच,

विशाल प्रकाशबापू पाटील