देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात महाराष्ट्रातील ज्या मतदारसघांकडे लोकांचं लक्ष आहे. त्यातीलच एक म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ… सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल केला. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र विशाल पाटील यांनी माघार घेतलेली नाही. निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत. काही वेळा आधी अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं. यात विशाल पाटलांनाही निवडणूक चिन्ह देण्यात आलंय. अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे ‘लिफाफा’ या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवाराना चिन्हाचं वाटप झालं. विशाल पाटील यांना कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांच लक्ष होतं. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलिंडर ही चिन्हे मागितली होती. विशाल पाटील यांनी मागितलेल्या पैकी चिन्ह विशाल पाटलांना मिळालं नाही. विशाल पाटील यांना ‘लिफाफा’ चिन्ह मिळालं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना शिट्टी चिन्ह मिळालं आहे.
विशाल पाटलांच्या निवडणूक चिन्हाची घोषणा होताच वसंतदादा भवन आणि विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर आतिषबाजी करत विशाल पाटील यांच्या समर्थकानी जल्लोष केला. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीनवाजेपर्यंत निवडणूक अर्ज मागे घेता येणार होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती.
महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणूक लढवीत असताना काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी परत न घेतल्यामुळे आघाडीत नाराजी असल्याचं समोर आलं आहे. नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेते येत्या 25 एप्रिल रोजी आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या जाहीर सभेत उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदीसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. विशाल पाटील यांच्या विरोधात शिस्तपालन समिती लवकरच कारवाई करणार आहे.