मिरज: सांगली जिल्ह्यातील आणि मिरज तालुक्यातील म्हैसाळ (Mhaisal, Miraj, Sangli) येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. त्या घटनेमुळे सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यानंतर खासगी सावकारीतून ही घटना घडली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे. आत्महत्या (Mass Suicide) करण्यापूर्वी या कुटुंबाने लिहिलेली चिठ्ठी सांगली पोलिसांना मिळाली आहे. त्या चिठ्ठीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने 8 सावकारांना (8 moneylenders) ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आत्महत्या केलेल्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), पत्नी रेखा माणिक वनमोरे (45), मुलगा माणिक आदित्य वनमोरे (15), मुलगी प्रतिभा माणिक वनमोरे (21), शिक्षक पोपट यल्लाप्पा वनमोरे (52), त्यांची पत्नी संगीता पोपट वनमोरे (48), मुलगा शुभम पोपट वनमोरे (28) आणि त्यांची मुलगी अर्चना पोपट वनमोरे (30) व आक्काताई यल्लाप्पा वनमोरे (वय 72, सर्व रा. नरवाड रस्ता, म्हैसाळ) यांचा समावेश आहे.
एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याने सांगली पोलिसांनाही तपास करण्याचे आवाहन आहे. त्यातच घटनास्थळाची तपासणी करत असताना पोलिसांना मृतदेहांशेजारी एक चिठ्ठी सापडली होती. त्या चिठ्ठीच्या आधारेच पोलिसांनी आता तपासाची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे.
ज्या वनमोरे कुटुंबीयांनी आत्महत्या केली आहे, त्यातील डॉ. माणिक वनमोरे हे खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर होते तर त्यांचे बंधू पोपट वनमोरे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. या दोघा भावांनी गावातील काही खासगी सावकार तसेच ओळखीतील काही जणांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची वनमोरे कुटुंबीयांना वेळेत परतफेड करता आली नव्हती. त्यामुळे सावकारांसह संबंधित व्यक्तींनी या कुटुंबीयांकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. त्याला कंटाळूनच या कुटूंबाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील डॉ. माणिक हे खासगी पशुवैद्यकीयचा व्यवसाय करत होते, तर त्यांचा मुलगा दहावीमध्ये व मुलगी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तर पोपट वनमोरे यांची मुलगी अर्चना ही कोल्हापूर येथील बँक ऑफ इंडियाच्या बाचणी (ता. कागल, जि. कोल्हापूर) शाखेत रोखपाल म्हणून नोकरीस होत्या. माणिक आणि पोपट या दोघांनी सावकारी पाशाला कंटाळूनच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. पोपट वनमोरे यांनी त्यांची मुलगी अर्चनाला कोल्हापूर येथून बोलावून घेतले होते. त्यानंतर दोघा भावांनी सुरुवातील कुटुंबातील इतरांना विषारी द्रव्य पाजून त्यानंतर स्वत: विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.