सांगलीः सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका (Municipal Corporation) येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महापालिकेकडून आता मोफत शैक्षणिक संच (Educational set) देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. खासगी शैक्षणिक संस्थांमुळे (Private School) जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळांमध्ये प्रवेश संख्या कमी झाली होती. हेच चित्र अनेक शहर आणि जिल्ह्यांमध्ये आहे. सांगली, कुपवाड आणि मिरज महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांना महानगरपालिकेच्या या उपक्रमाचा निश्चितच फायदा होणार असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
यावेळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले की, महापालिका प्रशासनातर्फे मनपा शाळांकडून गुणवत्तेबरोबरच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पहिलीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे.
या शैक्षणिक वर्षात मनपा शाळेत प्रवेश घेणाऱ्या पहिलीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय गणवेश, शूज, सॉक्स, स्कुल बॅग, 3 वह्या , दुरेघी वही, चौरेघी वही, गणित वही, चित्रकला वही, पाटी, पाटी पेन्सिल बॉक्स, पेन्सिल बॉक्स, खोड रबर बॉक्स, क्रेयॉन कलर्स, पट्टी, स्केच पेन बॉक्स, पिण्याच्या पाण्याची बाटली, रेनकोट असे शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाणार आहे.
त्यामुळे महापालिकेच्या या सुविधांचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घेऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश मनपा शाळांमध्ये घ्यावा असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.
याबरोबरच या शैक्षणिक वर्षांपासून अनेक कलांचे, खेळांचे व संगणक प्रशिक्षणही मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी शाळांच्या बरोबरीने वाटचाल करत असणाऱ्या महापालिका शाळामध्ये आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहनही मनपा आयुक्तांतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
अॅड. पानसरे हत्या प्रकरणात मोठी घडामोड, न्यायाधीशांनी संशयितांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळाला
वडिलांच्या मारेकऱ्याच्या मुलासोबत तरूणीने बांधली लग्नगाठ, आईनंही रोखलं नाही, कारण तर वाचा…