सांगली : सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील बेडग येथे म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात माधवनगर येथील तिघे तरुण वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना घडत असताना ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे तिघांमधील एका तरुणाला वाचविण्यात यश आले आहे. मात्र अन्य दोघे तरुण वाहून गेले आहेत. सलमान शौकत तांबोळी (वय 21) आणि आरमान हुसेन मुलाणी (वय 16) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. तर नदीम फिरोज मुलाणी (वय 18) असे वाचविण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे
म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या तरुणांचा शोध आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, माधवनगर येथे राहणारे संबंधित तिघे तरुण हे छोटा हत्ती टेंपो चालक आहेत. मंगळवारी दुपारी एका कामासाठी ते बेडग येथे आले होते.
मात्र भाडे सोडून झाल्यानंतर हे तिघेजण बेडग येथील म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्यात पोहण्यासाठी उतरले होते.
त्यावेळी पाण्याचा वेग प्रचंड असल्याने हे तिघेही तरुण वाहून गेले. यावेळी पाण्यातून तरुण बुडाल्याचे तेथे असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे यामधील नदीम मुलाणी नामक तरुणाला वाचविण्यात यश आले
मात्र, सलमान शौकत तांबोळी, आणि आरमान हुसेन मुलाणी हे दोघे तरुण वाहून गेल्याने त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. वाचविलेल्या तरुणाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिरज ग्रामीण पोलीस आणि आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांकडून पाण्यात बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे.