तब्बल 13 कोटींचा दंड ठोठावला, तरी नियम नाही पाळला… ‘या’ शहराने घेतला वाहतूक पोलिसांशी पंगा

| Updated on: Dec 22, 2023 | 11:41 AM

गेल्या वर्षभरात 21 हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करून त्या वाहनचालकांना तब्बल 13 कोटींचा दंड ठोठावण्यात आल्याचेी माहिती समोर आली आहे.

तब्बल 13 कोटींचा दंड ठोठावला, तरी नियम नाही पाळला... या शहराने घेतला वाहतूक पोलिसांशी पंगा
Follow us on

शंकर देवकुळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सांगली | 22 डिसेंबर 2023 : वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र असे असले तरी अनेक नागरीक गाडी चालवताना पुरेशी काळजी घेत नाही. वाहतूक नियम पाळणे तर दूरच राहिले. अशा वेळी मात्र वाहतूक पोलिसांकडून दंडाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. एकाद फाईन बसला, की त्यातून बोध घेऊन, लोक शहाणे होतील आणि पुढल्या वेळेस तरी नियम मोडणार नाहीत, अशी अपेक्षा असते. मात्र सांगलीकरांनी हे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे वर्षभरात दिसून आले. गेल्या वर्षभरात सांगलीतील 21 हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करून त्या वाहनचालकांना तब्बल 13 कोटींचा दंड ठोठावण्यात आल्याचेी माहिती समोर आली आहे.

अवघ्या 15 दिवसांत वसूल केला 54 लाखांचा दंड

सांगली महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेले सीसीटीव्ही आणि रस्त्यावर तैनात करण्यात आलेले वाहतूक पोलिस यांनी तब्बल 21 हजार 858 वाहनांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी वाहनचालकांना ठोठावलेल्या दंडाची एकूण रक्कम 12 कोटी 92 लाख 600रुपये इतकी आहे. ही कारवाई वर्षभरात झाली. पण त्यातूनही सांगलीकर काहीच शिकले नाहीत. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या पंधरा दिवसात तब्बल 54लाखांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.

बेदकारपणे वाहने चालवणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई केली गेली. शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध ठिकाणी पोलिस दलाकडून शंभरावर सीसीटीव्ही लावण्यात आले. महापालिका क्षेत्रातील सर्वच मुख्य रस्त्यांवर ही यंत्रणा कार्यान्वित झाली. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोबाईल डिव्हाईसद्वारे ‘ई-चलन’द्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. पोलिसांच्या या सातत्यपुर्ण कारवाईमुळे शहरासह जिल्हाभरात वाहनचालकांनी धास्ती घेतली आहे.

दरम्यान पुढील टप्प्यात ही कारवाई व्यापक प्रमाणवर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसात लोक अदालतीद्वारे ७२०९ वाहनचालकांकडून ५३ लाख ८६ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुढील टप्प्यात ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार असल्याचे – सांगली वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, यांनी सांगितले.