Sangli : कृष्णाकाठी सांगलीकरांनी अनुभवला होड्यांच्या शर्यतीचा थरार, ‘रॉयल कृष्णा’नं तिसऱ्यांदा पटकावला प्रथम क्रमांक

| Updated on: Jul 31, 2022 | 11:04 PM

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केशवनाथ उत्सव मंडळातर्फे आयोजित होड्यांच्या शर्यती झाल्या. आज आमच्या क्लबचा सलग तिसरा क्रमांक आलेला आहे, असे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या रॉयल कृष्णा बोटच्या खेळाडूंनी म्हटले आहे.

Sangli : कृष्णाकाठी सांगलीकरांनी अनुभवला होड्यांच्या शर्यतीचा थरार, रॉयल कृष्णानं तिसऱ्यांदा पटकावला प्रथम क्रमांक
होड्यांच्या स्पर्धेत सहभागी संघ
Image Credit source: tv9
Follow us on

सांगली : सांगली (Sangli) शहरात आज सायंकाळी सालाबादप्रमाणे याही वर्षी केशवनाथ उत्सव मंडळ यांच्या वतीने कृष्णा नदीच्या पात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन (Organizing boat races) करण्यात आले होते. या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी कृष्णा नदीचे दोन्ही घाट गर्दीने फुलून गेले होते. या होड्यांच्या शर्यतीमध्ये दहा होड्यांनी सहभाग नोंदविला होता. या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये सांगली वाडीच्या रॉयल कृष्णा बोटने प्रथम क्रमांक पटकाविला, इचलकरंजीच्या वरदविनायक बोट क्लबने द्वितीय क्रमांक पटकवला तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस सांगली वाडीच्या तरूण मराठा बोटाने पटकावले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. तरुणांनी स्पर्धेत सहभाग तर घेतलाच मात्र पाहायला आलेल्यांचीही मोठी गर्दी कृष्णा नदी (Krishna River) पात्राच्या परिसरात पाहायला मिळाली.

‘कोरोनाच्या दोन वर्षानंतर पाहायला मिळाला उत्साह’

श्री केशवनाथ उत्सव मंडळातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे यंदाचे 50वे वर्ष आहे. यास्पर्धा उत्तमरित्या पार पडल्या. तरुणांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रम घेतले. कोरोनाच्या दोन वर्षानंतर हा उत्साह पाहायला मिळाला. आमचे मंडळ 100 वर्षांपूर्वीचे आहे. तर 50 वर्षांपासून या स्पर्धा आम्ही घेत आहोत. विश्वनाथ निलकंठ मगदूम यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा घेतल्या जातात. तिसरा डोळा शंकराचा असतो. केशवनाथाचा असतो. श्रावणी सोमवार सुरू होत आहेत. त्यानिमित्त सांगलीकरांनी केशवनाथाच्या दर्शनाला यावे, असे स्पर्धेचे आयोजक राजकुमार मगदूम यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘मार्गदर्शकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विजय’

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केशवनाथ उत्सव मंडळातर्फे आयोजित होड्यांच्या शर्यती झाल्या. आज आमच्या क्लबचा सलग तिसरा क्रमांक आलेला आहे, असे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या रॉयल कृष्णा बोटच्या खेळाडूंनी म्हटले आहे. आमच्या मार्गदर्शकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हा विजय मिळाल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली. आमच्या चार होड्या आहेत आणि जवळजवळ चार संघ स्पर्धेत उतरतात, असे रॉयल कृष्णा बोटच्या खेळाडूंनी सांगितले. दरम्यान, गुलाल उधळत आणि ट्रॉफी स्वीकारत विजय साजरा करण्यात आला.