मुंबई : मागच्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झालं. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून 40 आमदार सरकारमधून बाहेर पडले. त्यामुळे महाविकास आघाडीच सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे आमदार आधी सूरत त्यानंतर आसामला गेले. तिथे हॉटेलमध्ये असताना एका आमदाराच फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं. सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते.
‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ हे शहाजी बापू पाटील यांचे शब्द प्रसिद्ध झाले होते. हे रेकॉर्डिंग खूपच व्हायरल झालं होते. त्यावेळी शिवसेनेत बंड करणाऱ्या शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर संताप व्यक्त केला होता.
शहाजी बापू पाटील काय बोलणार? याची उत्सुक्ता
अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात भेदभाव केला गेला असा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला होता. तेच अजित पवार आता शिंदे-फडवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे शहाजी बापू पाटील काय बोलणार? याची उत्सुक्ता होती.
‘भीती वाटत नाही’
“अजित दादांकडे अर्थ खातं गेल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थतता आहे, हे प्रसारमाध्यमांच मत आहे. शिवसेनेतील शिंदे गटाच्या आमदारांचे नाही” असं शहाजी बापू पाटील म्हणाले. “निधी वाटपाचे नियोजन निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस साहेब आणि अजित दादा योग्य पद्धतीने करतील असा विश्वास आहे. त्यामुळे भीती वाटत नाही” असं शहाजी बापू पाटील म्हणाले.
‘संजय राऊत हा अपशकुनी माणूस’
“अर्थ खातं अजित दादांना मिळू नये म्हणून आमदारांनी पळापळ केली असं संजय राऊत नारळाच्या झाडाखाली बसून बोलतात. पण आम्ही वर्षा बंगला आणि मंत्रालयात बसून बोलतो. कुठल्याही आमदाराने अजितदादांच्या विरोधात पळापळ केली नाही. भाकीत सांगणारा संजय राऊत हा अपशकुनी माणूस आहे” अशी टीका त्यांनी केली.
किती आमदार अजून येतील असा दावा
“संजय राऊत ज्याच्या बाजूने बोलतात त्यांचं वाटोळ होतं. आमच्यातील एकही आमदार कुठे जाणार नाही. उलट उद्धव साहेबांकडे असलेल्या 16 आमदारांपैकी सात ते आठ आमदार लवकरच शिंदे गटात येणार असा दावा त्यांनी केला. राजकारणात वादळ निर्माण करण्यासाठी आरोप केले जातात. असेच आरोप राष्ट्रवादीने खोक्यावरून आमच्यावर केले होते. कोण कोणाला देत नसतं आणि कोणी घेत नसते. हे त्यावेळेसही राष्ट्रवादीला पटलं होतं आणि आजही पटतंय” असं पाटील म्हणाले.
लोकसभेला किती जागा जिंकण्याचा शहाजी बापूंना विश्वास?
“राष्ट्रवादीच्या साथीमुळे महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 47 जागा येतील एखादी बारामतीची जागा सुप्रिया ताईंना मिळू शकते पण मी त्याबाबत जास्त बोलत नाही. महायुतीमध्ये विधानसभेला 225 च्या पुढे आमदार महाराष्ट्रात निवडून येतील” असं ते म्हणाले.