वाशिम: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे (Pooja Chavan) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडून मंगळवारी पोहरादेवीत (Pohradevi) जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. पोहरादेवी येथे संजय राठोड बंजारा समाजाला उद्देशून भाषण करण्याची दाट शक्यता आहे. यासाठी जवळपास 15 ते 20 हजार लोक जमतील, अशी माहिती पोहरादेवी संस्थानचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली. (Shivsena leader Sanjay Rathod will visit pohradevi temple today)
ते मंगळवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राठोड हे आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी येतात, असे सांगितले. आतादेखील पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यामुळे संजय राठोड आज पोहरादेवीच्या दर्शनाला येणार आहेत. आम्ही लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही संजय राठोड आल्यानंतर याठिकाणी 15 ते 20 हजारांची गर्दी जमण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जितेंद्र महाराज यांनी केले.
पोहरादेवी मंदिराच्या आवारात एक लहान स्टेजही उभारण्यात आले. या स्टेजवरून संजय राठोड भाषण करण्याची शक्यता आहे. याविषयी जितेंद्र महाराज यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी हे स्टेज भाषणासाठी उभारले नाही, असे म्हटले. मात्र, त्यावेळची वेळ पाहून निर्णय घेतला जाईल, असेही जितेंद्र महाराज यांनी सांगितले. त्यामुळे आज पोहरादेवीत नक्की काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) मंगळवारी पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडेअकराच्या सुमारास संजय राठोड सहकुटुंब याठिकाणी येतील, अशी माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. तसेच रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्याचे काम सुरु आहे. जेणेकरून गर्दी जमल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर टोकाची टीका होत आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरलेला आहे. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचे नाव आल्यानंतर ते अज्ञातवासात होते. त्यांचा नेमका पत्ता कोणालाही माहिती नव्हता. त्यामुळे या प्रकरणावर राठोड यांचे कोणतेही स्पष्टीकरण न आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या पार्श्वभूमीवर तब्बल 15 दिवसांनंतर राठोड पहिल्यांदाच सर्वांसमोर येत आहेत.
संबंधित बातम्या:
PHOTO | गबरु, केक आणि बरंच काही, पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा
(Shivsena leader Sanjay Rathod will visit pohradevi temple today)