हवेमुळे पुतळा कोसळला म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेना संजय राऊतांनी दिला दाखला, म्हणाले “91 वर्षांपूर्वी उभारलेला टिळकांचा पुतळा…”

| Updated on: Aug 27, 2024 | 12:03 PM

"महाराष्ट्रात हवा जोरातच असते. पण तरीही अनेक पुतळे हे समुद्रात, जमिनीवर जसेच्या तसे आहेत. पण तुमच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे", असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

हवेमुळे पुतळा कोसळला म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेना संजय राऊतांनी दिला दाखला, म्हणाले 91 वर्षांपूर्वी उभारलेला टिळकांचा पुतळा...
Follow us on

Sanjay raut Criticise CM Eknath Shinde : सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या ठिकाणी 45 किलोमीटर प्रति वेगानं वारे वाहत होते, त्यामुळं पुतळ्याचं नुकसान झाले, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आता मुख्यमंत्र्‍यांच्या या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

“महाराष्ट्रात हवा जोरातच असते. पण तरीही अनेक पुतळे हे समुद्रात, जमिनीवर जसेच्या तसे आहेत. पण तुमच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबद्दल भाष्य केले.

घाईघाईत उद्धाटन

“सरकार अजूनही हसत आहे. सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही. सरकार म्हणत आहे समुद्रावर जोरात वारा होता, किल्ल्यावर वारा असणारच, हे कोणाला मूर्ख बनवत आहेत. त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. त्यामुळे ते जमिनीपासून वर उडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणमधील पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांना अनेकांनी घाईघाईत उद्धाटन करु नका, असे सांगितले. पण तरीही उद्घाटन करण्यात आले”, असे संजय राऊत म्हणाले.

तुमच्या डोक्यात सत्तेची हवा

“महाराष्ट्रावर फार मोठा आघात झाला. महाराष्ट्रात हवा जोरातच असते. पण तरीही अनेक पुतळे हे समुद्रात, जमिनीवर जसेच्या तसे आहेत. पण तुमच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. १९३३ साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला. तो अजूनही तसाच आहे. तिथेही तोच वारा, त्याच वेगाने वाहतो, तीच हवा आहे. लोकमान्य टिळकांचा पुतळा तेव्हापासून आजपर्यंत तसाच उभा आहे. शिल्पकार रघुनाथ फडके यांनी १९३३ साली हा पुतळा खंबीरपणे उभा केला होता.

त्यानंतर १९५६ मध्ये पंडीत नेहरुंनी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा एक पुतळा बसवला आहे. तो किल्ल्यावर आहे, तिथेही हवा आहे. तोही आज सुस्थितीत आहे. पण 8 महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावर बनवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला. हा खूप मोठा अपमान आहे”, असे संजय राऊतांनी म्हटले.