“सरकारने ‘चिरडा व पळा’ योजना सुरु करा आणि लाडक्या पोरांना…”, संजय राऊतांचा संताप

| Updated on: Sep 12, 2024 | 8:36 AM

‘मिंधे-फडणवीस’ सरकारने ‘लाडक्या पोरां’च्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून हिट अ‍ॅण्ड रनमधील सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी. कशी आहे ही योजना?" अशा शब्दात संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली.

सरकारने ‘चिरडा व पळा’ योजना सुरु करा आणि लाडक्या पोरांना..., संजय राऊतांचा संताप
Follow us on

Chandrashekhar Bawankule Son Car Accident : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र हिट अँड रनची चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात भरधाव वेगात आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यात काही जण जखमी झाले. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या ऑडी कारमुळे हा अपघात झाला त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावे आहे. हा अपघात झाला, त्यावेळी गाडीत अर्जुन हावरे, रोनित चित्तमवार, संकेत बावनकुळे हे तिघेजण होते. ही गाडी संकेतचा मित्र अर्जुन चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यावरुन जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातून अग्रलेखातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत तोपर्यंत राज्यात सुख-शांती येणार नाही. लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील, असे संजय राऊत म्हणाले. ‘मिंधे-फडणवीस’ सरकारने ‘लाडक्या पोरां’च्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून हिट अ‍ॅण्ड रनमधील सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी. कशी आहे ही योजना? असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.

एकेकाळी आपले महाराष्ट्र राज्य हे उत्तम प्रशासन व कायदा- सुव्यवस्थेसाठी ओळखले जात असे. आता तसे चित्र दिसत नाही. भ्रष्टाचारास खुली सूट दिल्यामुळे राज्याची अशी अवस्था झाली आहे. नागपूरच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपींना ज्या प्रकारे वाचवले जात आहे, ते पाहता राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही हे स्पष्ट दिसते. नागपूरचे प्रकरण साधे नाही. बडे बाप के बेटे दारूच्या नशेत महागड्या गाड्या भरमसाट वेगाने चालवतात व रस्त्यावरील वाहने, माणसे यांना किड्या-मुंग्यांसारखे चिरडून फरार होतात. पुढे मग सागर बंगल्यावरील त्यांचे बॉस अशा गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. रस्त्यावर माणसे तडफडून मरतात. त्यांना मरू द्या. हा सध्याचा कायदा-सुव्यवस्थेचा ताळेबंद आहे, असे संजय राऊत म्हणाले.

संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे) व त्यांच्या मित्रांनी नागपूरच्या ‘लाहोरी’ बारमध्ये दारू पार्टी केली व झोकांड्या देत ते गाडीत बसले. धरमपेठ भागात गेल्यावर गाडीवरील नियंत्रण सुटले व वाहनांना जोरदार धडका देत हे तीन नशेबाज पुढे गेले. या अपघातात 17-18 जण गंभीर जखमी झाले. म्हणजे मानवी हत्या घडविण्याचाच हा गुन्हा मानायला हवा व गाडीतील त्या तिन्ही नशेबाजांना अटक करून पोलिसांनी कोठडीत डांबायला हवे होते, पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपार कृपादृष्टीमुळे गुन्हा नोंदविण्यापासून साक्षी, जबान्या, तपासात, सर्वच पातळय़ांवर संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे) यास वाचविण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही संजय राऊतांनी केला

‘एफआयआर’ अशा पद्धतीने बनवला गेला की, नशेबाज आरोपी सुटायलाच हवेत. गाडीचे मालक स्वतः युवराज संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे), पण ‘मिंधे-फडणवीस’ सरकारने ‘लाडक्या पोरां’च्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून हिट अ‍ॅण्ड रनमधील सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी. कशी आहे ही योजना? असा सवालही संजय राऊतांनी विचारला.