Sanjay Raut On Dhananjay Munde : गेल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे मराठवाडा, विदर्भ या भागातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेतात काढणीला आलेली अनेक पिकं डोळ्यासमोर जमीनदोस्त झाली. या मुद्द्यावरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल परभणीच्या पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण या ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडूनही या भागाची पाहणी करण्यात आली. आता यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. यानंतर आता विविध नेते मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यानतंर धनंजय मुंडे यांनी दौरा केला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या राज्याला कृषी मंत्री आहेत की नाही, असा प्रश्नही संजय राऊतांनी यावेळी विचारला.
काल आम्ही दुष्काळी भागात होतो. परभणी, हिंगोली, संभाजीनगर येथील रस्ते वाहून गेले. तिकडचे जे तरुण कार्यकर्ते आहेत, ज्यांची घरे शाळा गुरंढोरं वाहून गेली. त्यांनी कागदपत्रे आमच्यासमोर ठेवली. या ग्रामीण भागातील रस्त्याची कामे गुजरातच्या ठेकेदारांना दिली आहेत. महाराष्ट्रात तरुण नाहीत का. आम्ही काल फिरत होतो. दुष्काळाची अवस्था गंभीर आहे. सर्व वाहून गेलं आहे. सरकारने पंचनामा केला नाही. गुजरातच्या ठेकेदारांनी केलेले रस्ते वाहून गेले आहेत. आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यावर सरकारला जाग आली. मग तहसीलदार बीडिओ धावून गेले. इतके दिवस कृषी मंत्री कुठे होते? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
या राज्याला कृषी मंत्री आहेत की नाही. आदित्य ठाकरे येणार म्हटल्यावर कृषी मंत्र्याने पाहणीचा फार्स केला. ते गाडीतून उतरलेही नाही. त्यांनी जमिनीला पायही लावला नाही. उलट ते शेतकऱ्यांवर ओरडत होते. मी काय करू शकतो. मी काय तुमच्या शेतात येऊन काम करू का, असं कृषी मंत्री म्हणत होते. कृषी मंत्री शुद्धीत आहेत का? तुम्ही कृषी मंत्री आहात. जबाबदारी कुणाची आहे. या सर्वांचा पंचनामा काल आदित्य ठाकरेंनी केला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
पालकमंत्री या जिल्ह्याचे जे आहेत. मुख्यमंत्री आहेत. गडचिरोलीचा कायापालट करणार असं सांगत होते. आदिवासी आणि गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यापैक्षा या ठिकाणी खाण उद्योग आहे. त्याचा आर्थिक व्यवहार आपल्याला हातात राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा जवळ ठेवला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी नेमले आहेत. आदिवासींचा विकास नाहीये. आदिवासींना मृतदेह खांद्यावर घेऊन जावं लागत आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.