सावरकरांचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नव्हतं, विज्ञानवादी होतं, संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं

| Updated on: Mar 28, 2023 | 10:31 AM

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना घेरणाऱ्या भाजपवर संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली.

सावरकरांचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नव्हतं, विज्ञानवादी होतं, संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नव्हतं तर ते विज्ञानवादी होते, अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने सावरकर गौरव यात्रा आयोजित केली आहे. यानिमित्ताने राज्यभरात सावरकरांच्या जीवनचरित्राला उजाळा दिला जाणार आहे. तर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. यावरूनच संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सावरकर काय आहेत हे भाजपने आम्हाला शिकवू नये. आम्ही सावरकर जगलोयत, जगतोयत, त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नये. गद्दारांनी तर अजिबातच बोलू नये, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे-भाजपला खडे बोल सुनावले.

ही तर अडानी बचाव यात्रा..

सावरकरांचा मुद्दा घेत गौतम अडानी यांच्या प्रश्नाला बगल देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ सावरकर गौरव यात्रा नाव असलं तरी ती अडानी बचाव यात्रा आहे. गौतम अडानी लूटमारीवरचं महाराष्ट्राचं लक्ष विचलित व्हावं म्हणून सावरकरांच्या मुखवट्याखाली अडानी गौरव यात्रा काढतायत. वीर सावरकर महान देशभक्त होते. क्रांतिकारक, समाजसुधारक होते. संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेला त्यांचा आदर आहे. या ढोंगींनी आम्हाला सावरकर सांगण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय. शिवतीर्थावर सावरकरांचं भव्य स्मारक उभारण्यात बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं योगदान आहे. सावरकरांचं हिंदुत्व आम्ही स्वीकारलेलं आहे.

हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही..

संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटलं, ‘ आमचं हिंदुत्व सावरकरांप्रमाणे विज्ञानवादी आहे. शेंडी जानव्याचं नाही. हे भाजपला मान्य आहे का.. सावरकरांची गोमातेवरची भूमिका त्यांना मान्य आहे का? यांनी सावरकरांची यात्रा काढणं हाच अपमान आहे. मुख्यमंत्र्यांना फोन करा, सावरकरांच्या तीन क्रांतिकारक बंधूंची नावं माहिती आहेत का.. त्यांनी पटकन् सांगावं. सावरकरांचा जन्म कुठे झाला माहितीय का? सावरकरांच्या त्यागमूर्ती पत्नीचं नाव माहितीय का? सावरकरांची ‘जन्मठेप’ वाचली आहे का? वाचून दिलेले कागद वाचू नका. सावरकरांचा अपमान करू नका. आम्ही दिल्लीतही आमची भूमिका स्पष्ट केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.