कोल्हापूर : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) रोज कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता संजय राऊत हे कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात त्यांनी भाषण करताना विविध मुद्द्यांवरून भाजपवर (BJP) निशाणा साधलाच मात्र तुमची चंपाबाई आता काही कोल्हापुरात येत नाही, असं कळलं मला, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. कोल्हापुरात सहा आमदार होते, आता पाच का आले? ते आघाडी बिघाडी नंतर बघू काय करायचं ते. आता 3 खासदार आहेत. पुढे सहा आमदार आले पाहिजेत. त्या आधी कोल्हापूर महापालिका निवडणूक, तसेच तुमची चंपाबाई आता कोल्हापुरात येत नाही असं कळालं मला. आता कोल्हापूरचा महापौर शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही, असेही संजय राऊतांनी यावेळी बजावलं आहे.
तर यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपच्या तिजोरीचा हिशोबही मांडला आहे. देशात सगळ्यात भ्रष्ट पक्ष भाजप आहे. भाजपच्या तिजोरीत किती पैसे आहेत माहिती आहे का? साडे पाच हजार कोटी रुपये त्यांच्या तिजोरीत आहेत. ते पैसे आले कुठून. काँग्रेससारख्या जुन्या पक्षाकडे पाचशे सहाशे कोटी असतील. भाजपकडे इतका पैसा आला कुठून? तुम्हाला व्यापारी, उद्योगपती दोन नंबरचे कामं करण्यासाठी पैसे देतात, असे म्हणत त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे. असे म्हणत त्यांनी कोल्हापुरातून भाजपकडे किती पैसा आहे? हेही सांगितलं आहे.
तर संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात रोज आरोप प्रत्यारोप सुरू असतात. आजही त्यांनी कोल्हापुरातून किरीट सोमय्या यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. किरीट सोमय्या लवकरच जेलमध्ये जाईल. कुणीही सुटणार नाही. विक्रांतचा घोटाळा त्यांनी केला. जिच्या जिवावर आपण पाकिस्तानविरोधातील युद्ध जिंकलो तिच्या नावाने भ्रष्टाचार केला. ते महाशय म्हणाले सरकारकडे पैसे नसतील तर मी तिनशे कोटी गोळा करतो. पैसे गोळा केले, कोट्यवधी रुपये गोळा केले. मग माझ्या लक्षात आलं की पैसे गेले कुठे? मी राज्यपालांना पत्र लिहिलं. राज्यपालही त्यांचाच कार्यकर्ता. त्यांना समजलं नाही त्यांनी सांगितलं की राजभवनाकडे असे कुठलेही पैसे आले नाहीत. त्याने माझ्यावर 300 कोटीचा दावा ठोकलाय. अरे हजारचा टाक… तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सोमय्यांना त्यांनी केल्हापुरातून दिला आहे.