सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उद्घाटनानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. यावरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कोट्यवधी रुपये खाल्ले. हे ठाणे कनेक्शन आहे. कंत्राटदार सर्व गायब आहे. मुख्यंत्र्याच्या मुलाला विचारा कंत्राटदार कुठे आहे. मुख्यमंत्र्याच्या मुलाला विचारा आपटे कुठे आहे, असं म्हणत राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे.
खासदार नारायण राणे यांच्यावरही संजय राऊतांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या काळात पूल कोसळला. त्यात दीडशे लोक मेले. त्यावर बोला म्हणावं. नारायण राणे तुम्ही खासदार आहात. तुम्ही मराठी माणूस आहात. तुम्ही तरी विचार करून बोला. कुणाची बाजू घेत आहात. हे जर कोणत्या राज्यात झालं असतं तर नारायण राणे आणि त्यांची मुलं नागडी नाचली असती. तुमच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला. तुम्ही खासदार आहात. तुम्ही शिवभक्त असाल तर रस्त्यावर उतरायला हवं होतं. या कामात पैसे खाल्ले. महाराजांच्या पुतळ्यात कोट्यवधी रुपये खाल्ले. हे ठाणे कनेक्शन आहे. कंत्राटदार सर्व गायब आहे. मुख्यंत्र्याच्या मुलाला विचारा कंत्राटदार कुठे आहे. मुख्यमंत्र्याच्या मुलाला विचारा आपटे कुठे आहे, असं संजय राऊत म्हणाले.
नेव्हीने काय बनवलं? हा पुतळा पीडब्ल्यूडीने बनवलं. तुमचं सरकार जबाबदार आहे. फडणवीस आमचं तोंड उघडू देऊ नका. तुमचं पाप आहे. महाराजांचा पराभव अफजल खान, औरंगजेब करू शकला नाही. भाजप आणि फडणवीस यांची विकृत मनोवृत्तीने महाराजांचा पराभव झाला आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर राऊतांनी टीका केलीय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात शेकडो कोटींचा व्यवहार झाला. महाराजांच्या नावाने हे सरकार भ्रष्टाचार करतं आणि पैसे खातं. त्याच पैशातून निवडणुका लढणार आहे. याचा निषेध करून फक्त षंड बसायचं का? आज मालवणमध्ये मोर्चा निघत आहे. आदित्य ठाकरे या मोर्चात उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक असणार आहेत. पण हे आंदोलन संपणार नाही. मी स्वत: परवा चाललो आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.