नाशिक : “वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) यांच्या शिवसेना प्रवेशाचे सर्वांनी स्वागत केले आहे. कुणाचा पक्षप्रवेश होत असला की वाद निर्माण होतात. या ठिकाणी मात्र सगळे आनंदात आहेत. येथे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. गीते आणि बागुल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सर्वांना आनंद होत आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेना विस्तारण्यास मदत होईल,” असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच, गीते आणि बागुल यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची भगवी शाल अधिक उबदार आणि तेजस्वी झाल्याची भावना राऊत यांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये पूर्वाश्रमीचे भाजप नेते वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज (8 जानेवारी) शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान राऊत बोलत होते. (Sanjay Raut on Vasant Gite and Sunil Bagul shivsena joining ceremony)
यावेळी बोलताना नाशिक हा पुन्हा एकादा शिवसेनेचा बालेकिल्ला होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा गड होण्यासाठी बागूल आणि गीतेंचे योगदान महत्त्वाचे असेल. दोन्ही नेते आम्हाला नवे नाहीयेत. आम्ही परके नाहीत. त्यांच्या येण्याचं प्रत्येक शिवसैनिकाने स्वागत केलं आहे. हे नेते शिवसेनेत यावेत अशी भावना नाशिकच्या प्रत्येक शिवसैनिकात होती,” असे राऊत म्हणाले. तसेच, त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेना पुन्हा आपला विस्तार करु शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिकची महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर गीते आणि बागुल यांचा शिवसेना प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय. यावर बोलताना. “काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गीते आणि बागुल यांची बैठक झाली. काल रात्री आम्ही चर्चा केली. आम्ही सातत्याने एकमेकांना बोलत होतो. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशावर निश्चिती झाली. आता त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होतो आहे. या सोहळ्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील,” अशी माहिती राऊत यांनी दिली. तसेच, या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्यांच्यावर कोणती जबाबदारी द्यायची ते ठवरले जाईल, असेही त्यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे नाशिकचा पुढचा महापौर हा शिवसेनेचाच असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नाशिकचे राजकीय समीकरण बदलणार असल्याचे म्हटलं जात आहे. आगामी काळात गीते आणि बागुल यांच्यावर दिल्या जाणाऱ्या जबाबदारीवही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील असं राजकीय जाणकार म्हणत आहेत.
संबंधित बातम्या :
(Sanjay Raut on Vasant Gite and Sunil Bagul shivsena joining ceremony)