मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लोकसभेचे सदस्यत्व गेले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी माफी मागायला मी सावरकर नाही तर गांधी आहे असे विधान केले. त्यामुळे मोठा वादंग उठला आहे. शिवसेना आणि भाजपने या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाची कोंडी केली आहे. उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी मागणी शिवसेना नेते ( एकनाथ शिंदे ) करत आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर काल दिल्लीत विरोधी पक्षाची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनुपस्थित होते. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या बैठकीत वीर सावरकर काय होते, त्यांची भूमिका काय होती याबद्दल परखड मत मांडले. सावरकर हा आघाडीतला वादाचा विषय ठरू नये. ते महान क्रांतिकारक होते हे मान्य केले पाहिजे हे पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या मुद्द्याचे सगळ्या प्रमुख विरोधी पक्षांनी समर्थन केले आहे. विरोधी पक्षाच्या जवळजवळ सर्वच प्रमुख नेत्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्याशी चर्चा झाली. आमचा संवाद सुरु आहे. त्यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.
ज्या राहुल गांधी यांच्या कुटुंबीयांनी या देशावर नुसते राज्य केले नाही. तर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला. देशासाठी आपली सर्व संपत्ती दान केली. त्या राहुल गांधींना फक्त 24 तासात तुम्ही घर रिकामे करायला सांगता याचा निषेध करावा तितका थोडा आहे. असे अनेक खासदार आहेत जे निवृत्त होऊनही बंगले बळकावून बसले आहेत.
खासदारकी जाऊनही त्यांनी बंगले सोडलेले नाहीत. सहा सहा महिने उलटूनही त्यांनी ते बंगले बेकायदेशीपणे बळकावले आहेत. अनेक भाजपचे खासदार, पदाधिकारी, संघ परिवारातील अनेकांनी दिल्लीमध्ये गेस्टच्या नावाखाली बंगले बळकावले आहेत. अशावेळी राहुल गांधी यांना लगेच बाहेर काढता हे अत्यंत घृणास्पद आहे अशी टीका राऊत यांनी केली.
महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडण्याची गरज आहे, असे भाजपवाले म्हणतात. बाहेर पडून काय करायचे ? तुमच्या मांडीला मांडी लावून बसायचे ? तुम्ही ज्या गद्दारांना घेऊन मांडीवर बसला आहेत त्यांच्या बाजूला बसायचे ? त्याची काही गरज नाही.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल आणि दिल्लीमध्येही 2024 ला बदल होईल. त्यांना शिवसेनेची भीती वाटत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना असल्यामुळे शंभर टक्के महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल ही भीती त्यांना आहे त्यामुळेच ते अशी वक्तव्ये करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.