नागपूर: ठाकरे सरकारमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं महाविकास आघाडीचे नेते उठताबसता सांगत असतात. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही महाविकास आघाडी मजबूत असल्याचं अनेकदा सांगितलं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (shridhar patankar) यांच्यावर ईडीने (ed) कारवाई केल्यानंतर राऊत यांनी पहिल्यांदाच आघाडीतील मतभेदावर भाष्य केलं. ईडीच्या कारवायांनी सरकार अस्थिर होईल असं काही नाही. असं कधी सरकार अस्थिर होतं का? उलट सरकार अधिक मजबूत झालं. आमच्यात ज्या काही फटी पडल्याचं वाटत होतं, त्या फटी बुजल्या आहेत. आमच्यात मतभेद असल्याच्या काही ठिकाणी संशयाला जागा होत्या, त्या बुजल्या आहेत. या निमित्ताने आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रं आले आहेत, अशी कबुली शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. टीव्ही9 मराठीशी एक्सक्ल्युझिव्ह संवाद साधताना राऊत यांनी ही कबुली दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का? असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर, मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं हे जगासमोर का मांडू? हा आमच्या घरातील प्रश्न आहे. आमचं सर्वांचं एक मत आहे. दमन शाहीविरोधात लढलं पाहिजे. आम्ही वाकणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.
पाटणकर प्रकरणात मालमत्ता जप्त करण्यापूर्वी चौकशी करायला हवी होती. पण त्यांनी कारवाई केली. ही हुकूमशाहीची नांदी आहे. कुणी कुणाला घाबरलेलं नाही. का घाबरायचं? सर्वांनी एकजुटीने लढावं ही महाविकास आघाडीची भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही काही लोकांवर आरोप केले होते. त्याच्या कारवाईचं काय झालं? असा सवालही राऊत यांना करण्यात आला. त्यावर राऊत यांनी कारवाई होईल असं त्यांनी सांगितलं. पोलीस हळूहळू कारवाई करतील. आमचं कॉलर पकडली आणि तुरुंगात टाकलं असं नाही. हे कायद्याचं राज्य आहे. कुणावर अन्याय होऊ नये या मताचे आहोत. त्यामुळे पोलीस कारवाई करतील हे दिसून येईल, असं ते म्हणाले.
जितेंद्र नवलानी प्रकरणी कारवाई सुरू आहे. एक सूत्रं लक्षात घ्या. कालपासून विदर्भ, मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू झालं. हे अभियान सुरू झाल्यानंतर त्याचा वेग पकडू लागला. या अभियानाला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाला प्रसिद्धीही मिळत आहे. या अभियानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर ईडीच्या कारवाया सुरू झाल्या. काल सकाळपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्याबरोबर ईडीने ही कारवाई सुरू केली आहे. या अभियानावरून लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.
त्यांना कितीही कारवाई करू द्यात. कुठेही जाऊ देत. त्यांना जायचं तिथपर्यंत जाऊ द्या. यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. भविष्यात यांची लाकडं सोनापुरात रचली गेली आहेत. त्यांना तिथून कायमचं हे राम म्हणावं लागेल, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
BJP नेते रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?; संजय राऊतांचा सवाल