मुंबई: शिवसेनेने (shivsena) भाजपसोबतची युती तोडल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. राज यांच्या या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी समाचार घेतला आहे. अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? याचा अभ्यास करावा लागेल. शिवसेना आणि आमच्यात काय झालं हे आम्ही पाहू. तुम्ही तुमचं पाहा, असं सांगतानाच काल शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा वाजत होता. स्क्रिप्टही भाजपचीच होती आणि टाळ्या, घोषणाही भाजपच्याच स्पॉन्सर्ड होत्या, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एवढी विकासाची कामे केली. मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन केलं. ते त्यांनी दिसलं नाही का? त्यावर राज ठाकरे एक शब्दही का बोलले नाही? असा सवालही राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला. तुम्हाला एवढं उशिरा कसं आठवलं? थोडसं आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? त्याचा आता अभ्यास करावा लागेल. अडीच वर्षानंतर बोलत आहात. भाजप आणि शिवसेनेत काय झालं ते आम्ही पाहू. तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही आत यायची. आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्ही तुमचं पाहा, काल शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा सुरू होता. त्यांचीच स्क्रिप्ट होती. लोकांच्याही मनात तेचं आलं. लोकांना वाटलं कालची सभा भाजपची आहे. मदरशात धाडी हे टाळीचं वाक्य आहे असं वाक्य अनेकदा ऐकेलं आहे. टाळ्या आणि घोषणाही त्यांच्या होत्या. त्यावर न बोललेलं बरं. काल मेट्रो आणि मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्री काम करत आहे. एवढं मोठं ऐतिहासिक काम झालं. अहो त्याच्यावर बोला, असं राऊत म्हणाले.
भोंग्याचं काय करायचं? तुमच्या भोंग्याचं काय करायचं? यांच्या भोंग्याचं काय करायचं? त्यासाठी सरकार समर्थ आहे. भाजप शासित राज्यात किती भोंगे हटवले ते सांगा? असा सवाल करतानाच काल शिवतीर्थावरचा भोंगा भाजपचाच होता. भाजप त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढत आहे. पण त्यावर आम्ही फार बोलणार नाही. आमचा दृष्टीकोण विकासाचा आहे. राज्य पुढे न्यायचं आहे. राज्यात संकटं येतात त्यावर मात करून पुढे जायचं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची घुसखोरी सुरू आहे, त्याविरोधात लढायचं आहे. हे करत असताना शिवसेनेचा भगवा फडकावायचा आहे, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जातीवाद पसरवला या राज यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. शरद पवारांनी जातीवाद पसरवला म्हणता. अहो, पवारांच्या चरणाशी तुम्हीही जात होतात सल्लामसलत करायला. कशा करता आपण टोलेजंग माणसावर बोलायचं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही टोलेजंग माणसं आहेत. त्यांच्यावर कशाला बोलता. तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्याही स्पॉन्सर्ड आहेत. शिवतिर्थावरचा भोंगा हा भाजपचा होता. काल एकच महाराष्ट्राला दिसलं अक्कलदाढ उशिरा कशी येते? असं ते म्हणाले.
युतीत निवडणुका लढून दोन्ही काँग्रेससोबत आघाडी का केली या राज ठाकरे यांच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. या देशात असं अनेकदा झालं. शेवटी बहुमत निर्माण होतं तेव्हा सरकार बनतं. युतीचं बहुमत झालं नाही. आघाडीचं बहुमत झालं. राज्याच्या स्थैर्यासाठी, खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनलं आहे हे त्यांना माहीत आहे. काल मराठीभाषा भवनचं स्वागत करायला हवं होतं. एवढं मोठं कार्य काल घडलं. त्याबाबत काल बोलले नाही. फक्त टीका करायची. त्यातून काय मिळतं. आहे ते सुद्धा गमावून बसाल, असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही – जितेंद्र आव्हाड