“फडणवीसांनी अनिल देशमुखांच्या क्लिप्स काढाव्याच”, संजय राऊतांचे चॅलेंज, म्हणाले “विरोधकांना ब्लॅकमेल…”

| Updated on: Jul 27, 2024 | 10:57 AM

"क्लिप्स’ करणे व लोकांना ब्लॅकमेल करणे हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचे राजकारण टिकून आहे", अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.

फडणवीसांनी अनिल देशमुखांच्या क्लिप्स काढाव्याच, संजय राऊतांचे चॅलेंज, म्हणाले विरोधकांना ब्लॅकमेल...
Follow us on

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis : “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनिल देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या त्यांनी काढाव्याच, एकदा महाराष्ट्राला भाजपची विकृती व लायकी कळायलाच हवी”, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. “क्लिप्स’ करणे व लोकांना ब्लॅकमेल करणे हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचे राजकारण टिकून आहे”, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात सरळ सरळ फसविण्यात आले व यातून सुटका करून घ्यायची असेल तर आम्ही सांगतो त्या प्रतिज्ञापत्रांवर मुकाटपणे सह्या करा, असे देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला. ‘‘फडणवीस यांनी हे जे उपद्व्याप केले, त्याचे ‘पेन ड्राईव्ह’ पुरावे आपल्याकडे आहेत. ते आपण बाहेर काढू,’’ असे देशमुखांनी जाहीर करताच फडणवीस यांनी ‘‘आमच्याकडेही देशमुखांच्या काही क्लिप्स आहेत, त्या बाहेर काढू. मग बघा!’’ असा दम भरला. म्हणजे फडणवीस यांनी भाजपच्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन घडवलेच. विरोधकांचे फोन चोरून ऐकणे, फोन रेकॉर्ड करणे, व्हिडीओ क्लिप करण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरणे व पुढे त्या माध्यमातून आपल्या राजकीय विरोधकांना ब्लॅकमेल करणे हा अलीकडचा मूळ धंदा झालाच आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“अशा क्लिपचा वापर करुन मोदी-शहा-फडणवीस यांनी पक्षांतर्गत विरोधकांना गप्प केले. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. अनिल देशमुख यांच्यामागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावण्याचे सूत्रधार हे फक्त फडणवीसच असू शकतात. ठाकरे सरकार पाडून खुर्चीवर चढण्याची त्यांना अशी घाई झाली की, त्यासाठी तेव्हा कोणत्याही थराला जायची तयारी होती. ‘‘मुख्यमंत्री ठाकरे व इतर तिघांविरुद्ध आम्ही सांगतो ते आरोप करा, तशा प्रतिज्ञापत्रांवर सही करा. मग आम्ही हे सरकार पाडतो व तुमची अटक टाळतो,’’ असा हा सौदा होता”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

हाच भाजपचा जोडधंदा

“हे सर्व पाहिले की, कायदा, न्याय व्यवस्थेचा या मंडळींनी कसा सर्रास गैरवापर केला हे लक्षात येते. विरोधकांच्या ऑडिओ क्लिप्स तयार करून फडणवीस यांना पुरवण्याचे काम तेव्हा रश्मी शुक्ला यांच्यासारखे अधिकारी करीत होते. त्यामुळे ‘क्लिप्स’ वगैरे प्रकरणात फडणवीस यांना भलताच रस आहे. त्यांनी भाजपअंतर्गत अनेकांच्या क्लिप्स तयार करून त्यांना संपवले. संघाचे नेते संजय जोशी यांच्या बनावट वादग्रस्त क्लिप्स कोणी केल्या व प्रसारित केल्या हे जगाला माहीत आहे. ‘क्लिप्स’ करणे व लोकांना ब्लॅकमेल करणे हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचे राजकारण टिकून आहे.”

“अनिल देशमुखांनी अशा क्लिप्सच्या राजकारणालाच आव्हान दिले आहे. एवढेच नव्हे तर फडणवीसांवर आपण जे आरोप केले आहेत ते सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे व्हिडीओ रेकॉर्डिंग आहेत. कोणी आपल्याला आव्हान दिले तर आपण ते सर्व उघड करू, असा गंभीर इशाराही देशमुख यांनी दिला आहे. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या त्यांनी काढाव्याच. एकदा महाराष्ट्राला भाजपची विकृती व लायकी कळायलाच हवी!”, असे संजय राऊत म्हणाले.