नागपूर, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा कुणाला पाठिंबा, संजय राऊत यांनी सांगितलं

| Updated on: Jan 16, 2023 | 6:10 PM

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत विस्कळीतपणा दिसला. यापुढच्या निवडणुकीत अधिक काळजीपूर्वक पाऊल टाकली पाहिजे. अशाप्रकारचे घोळ आणि गोंधळ होता कामा नये.

नागपूर, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा कुणाला पाठिंबा, संजय राऊत यांनी सांगितलं
संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये फूट नाही. उद्या नागपूर (Nagpur) आणि नाशिकचं (Nashik) चित्र स्पष्ट होईल. असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटलं. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचं काय ठरलं हे सगळ्यांना हळूहळू समजेल. राज्यात पाच जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकांचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेस पक्षाचा उमेदवारीचा घोळ झाला. तो घोळ अजूनही चालू आहे. त्यात काही आम्हाला पडायचं नाही. शिवसेनेनं काल शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा पाठिंबा मागितला. आम्ही तो त्यांना दिला. त्या लढतीत चांगल्या प्रकारे पुढं जाऊ शकतात, असं वाटलं. त्यामुळं शुभांगी पाटील यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला.

यासंदर्भात आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सूचना दिली. उद्धव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, ठाकरे गटाचे पदाधिकारी शुभांगी पाटील यांना पाठिंबा देतील.

 

नागपूरची उमेदवारी मागे घेतली

नागपूर शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नाकाडे होते. त्यांची उमेदवारी मागे घ्यायला सांगितली. महाविकास आघाडीसंदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यांनी एकत्रित लढलं पाहिजे. त्यामुळं आम्ही नागपूरची उमेदवारी मागे घेतली. काँग्रेसच्या आडमुले या उमेदवाराच्या मागे ठाकरे गटाची शिवसेना उभी राहील.

नाना पटोले-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

यासंदर्भात आज सकाळी नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. त्यातून हे सर्व निर्णय घेण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं.

अशाप्रकारचा घोळ होता कामा नये

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत विस्कळीतपणा दिसला. यापुढच्या निवडणुकीत अधिक काळजीपूर्वक पाऊल टाकली पाहिजे. अशाप्रकारचे घोळ आणि गोंधळ होता कामा नये. हा धडा महाविकास आघाडीच्या घटकपक्षातून घेतला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

आमच्या भूमिका आम्ही ठरवू

नागपूर शिवसेनेसाठी सोडलं होतं. पण, प्रत्येकवेळी त्याग करण्याची जबाबदारी शिवसेनेवरच असते. विरोधकांचं ऐक्य या शब्दाला घेऊन आम्ही हा त्याग करत आलो. पण, यापुढं असं होणार नाही. यापुढं आम्ही आमच्या भूमिका ठरवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.