नागपूर: ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवायांवरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर (bjp) घणाघाती हल्ले सुरू केलेले आहेत. आता तर राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्यावरच निशाना साधला आहे. रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्याची चर्चा जगभर सुरू आहे. आमच्या सारखे लोक सुद्धा रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यातून वाचलोय, असा टोला लगावतानाच सध्या देशाचं वातावरण बदलून गेलंय, असं संजय राऊत म्हणाले. दैनिक ‘लोकमत’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला.
पुन्हा येईन वाले संध्याकाळी इथे येणार आहेत. तेव्हीही मी येईल. बाजूला बसेल. पुढच्या वर्षी लोकमतच्या कार्यक्रमात येईल, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत कालपासून नागपूर दौऱ्यावर आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नागपूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत आहेत. शिवसेना मजबूत करण्याच्या अनुषंगाने रणनीती आखली जात आहे. तसेच नागपूरकरांशीही राऊत संवाद साधून शिवसेनेची आणि राज्य सरकारची कामगिरी मांडत आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनी आज सकाळी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचं लक्ष नाही. केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू आहे. काल पाटणकरांवर कारवाई केली. त्या कारवाई मागचं सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावं. हे नीट समजून घ्या. चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत. हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील. ही आमच्याविरोधातील बदनामीची मोहीम आहे. हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही. मी पूर्ण विश्वासाने सांगतो आत्मविश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला होता.
जितेंद्र नवलानी प्रकरणी कारवाई सुरू आहे. एक सूत्रं लक्षात घ्या. कालपासून विदर्भ, मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू झालं. हे अभियान सुरू झाल्यानंतर त्याचा वेग पकडू लागला. या अभियानाला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाला प्रसिद्धीही मिळत आहे. या अभियानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर ईडीच्या कारवाया सुरू झाल्या. काल सकाळपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्याबरोबर ईडीने ही कारवाई सुरू केली आहे. या अभियानावरून लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
BJP नेते रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?; संजय राऊतांचा सवाल