खुर्चीला बांधलेला घोडा, गुलामगिरीची सवय… संजय राऊत यांचं ट्विट चर्चेत, कुणावर निशाणा?

| Updated on: Mar 29, 2023 | 10:29 AM

सुषमा अंधारे आणि संजय शिरसाट यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असतानाच संजय राऊत यांच्या ट्विटची नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

खुर्चीला बांधलेला घोडा, गुलामगिरीची सवय... संजय राऊत यांचं ट्विट चर्चेत, कुणावर निशाणा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी मंगळवारी राजकीय वातावरण प्रचंड तापलं. शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर आता काय कारवाई होतेय, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर शिवसेनेची महिला आघाडी शिरसाट यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये संजय राऊत यांचं एक ट्विट जोरदार चर्चेत आहे. एरवी रोखठोक शब्दांच्या फटकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या संजय राऊत यांनी आजच्या ट्विटमध्ये चारच शब्द वापरलेत. मात्र त्यासोबत जोडलेला फोटो प्रचंड बोलका आहे. खुर्चीला बांधलेला घोडा, असा हा फोटो असून यातून राऊत यांचा निशाणा नेमका कुणावर आहे, यावरून आता चर्चा सुरु आहेत.

एक फोटो बस्स…

एरवी धारदार शब्दांतून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणाऱ्या संजय राऊत यांनी आजच्या ट्विटमध्ये एका फोटोतून नेमकं कुणाला टार्गेट केलंय, याचे आडाखे आता बांधले जात आहेत. या फोटोत एक काळ्या रंगाचा घोडा उभाय. त्याच्या गळ्यात दोर असून ते खुर्चीला बांधण्यात आलंय. गुलामी की जब आदत पड जाती है, तो हर कोई अपनी ताकत को भूल जाता है… असं वाक्य या फोटोवर लिहिलेलं आहे.

टार्गेट कोण कोण?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले सगळे आमदार गद्दार असून ते भाजपची गुलामी करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी वारंवार केला आहे. सत्तेपायी हे भाजपचे तळवे चाटत असतात, अशी टीकाही करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेते सत्तेसाठी आपली ताकद विसरून भाजपच्या दावणीला बांधले गेलेत, असा अर्थ राऊत यांना यातून अभिप्रेत असावा, अशी चर्चा सुरु आहेत.

तर सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या टीकेतही घोडा हा शब्द वापरण्यात आलाय. संजय शिरसाट यांना जे शब्द जिव्हारी लागले, त्यावरून त्यांनी कालच माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं. मात्र तोच शब्द न वापरता फोटो वापरून संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांना पुन्हा एकदा जाणूनबुजून टार्गेट केलंय, अशीही चर्चा आहे.

आज राजकीय वर्तुळात संजय राऊत यांचं हे ट्विट जोरदार चर्चेत आले. यातून नेमका कुणावर निशाणा साधायचाय, यावरून राऊतदेखील त्यांच्या खास शैलीत लवकरच स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.

‘संजय शिरसाट यांचा अहवाल 48 तासात द्या’

दरम्यान, संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वाद महिला आयोगाकडे गेला आहे. आयोगाने छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल ४८ तासात पाठवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.