दिनेश दुखंडे, मुंबई : शिंदे-भाजप (Shinde BJP) सरकारवर आगपाखड करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना आणखी एक पत्र पाठवलंय. आपल्या सोबत सरकारमध्ये काही बाजारबुणगे आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मी याआधीही दिले होते. आताही देतोय.. राज्यातला भ्रष्टातार मोडून काढावा, या लोकांवर कारवाई करावी, या भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो अशी विनंती संजय राऊत यांनी या पत्रातून केली आहे. भाजप आमदार राहुल कुल, शिवसेना आमदार दादा भुसे तसेच किरीट सोमय्या यांच्याविरोधात संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल राऊत यांनी केलाय.
संजय राऊत यांनी याआधीही किरीट सोमय्या, राहुल कुल आणि दादा भूसे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते आरोप पुढील प्रमाणे-
राहुल कुल- भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचं मनी लाँडरींग झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. दौंड येथे हा कारखाना आहे.
दादा भुसे- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून १७८ कोटींचे २५ लाख शेअर्स गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाइटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखवल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.
किरीट सोमय्या- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही दिशेब दिलेला नाही. या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना क्लिन चिट दिली हे धक्कादायक आहे, असं राऊत यांनी पत्रात लिहिलंय.
बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरेच घडले आहे का, आपल्याच सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये आणि लांड्या लबाच्यांबाबत कारवाई करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो, अशा आशयाचं पत्र संजय राऊत यांनी १ एप्रिल रोजी फडणवीस यांना लिहिलं आहे. राऊत यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती दिली.