नवी दिल्ली : या देशात जो प्रकाश पडलाय तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच (PM Narendra Modi). मोदी हेच सूर्य, मोदी हेच चंद्र, धुमकेतूही मोदीच आहेत. शीतल चांगणं मोदींमुळेच पडतं. नद्यांचं वाहणं, समुद्राचा खळखळाटही मोदींमुळेच होतो, माझा श्वास चालतो, तोदेखील मोदींमुळेच… अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय. अर्थात भ्रष्टाचारावरून संताप व्यक्त करताना अत्यंत उपहासात्मक शैलीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय. इथे सगळंच मोदी करतात, मग भ्रष्टाचाराला या देशात संरक्षण का दिलं जातंय? गैरव्यवहार करणाऱ्यांना भाजपची कवचकुंडलं का आहेत, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केलाय. नवी दिल्लीत आज राऊत यांनी भ्रष्टाचाराचा विषय लावून धरला.
राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील 3 भ्रष्टाचारी नेत्यांविरोधात मी याआधीही पत्र लिहिलं होतं. पुरावे दिले होते. आतादेखील एक पत्र लिहिलं आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. भाजप आमदार राहुल कुल, किरीट सोमय्या आणि शिवसेना मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिले आहेत. मात्र त्यांच्यावर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. पंतप्रधान मोदी एकिकडे भ्रष्टाचाराविरोधात बोलतात तर दुसरीकडे भ्रष्टाचारींना कवचकुंडलं प्रदान करतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मोदी हे सूर्य आहेत, चंद्र आहेत. धुमकेतू आहेत. पण त्यांनी गेल्या काही काळात निरमा वॉशिंग पावडरचं उत्पादन सुरु केलंय. भाजप धुलाई यंत्र सुरु केलंय. त्याच्यावर बोला. मोदी आणि त्यांची यंत्रणा केंद्रापासून राज्यापर्यंत भ्रष्टाचाराला कवचकुंडलं म्हणून वापरते.
गौदम अडानी, नीरव मोदी, विजय माल्या, किरीट सोमय्या यांना कोण संरक्षण देतंय..याच्यावर फडणवीस यांनी बोलावं, असा आव्हान संजय राऊत यांनी दिलं.
ठाण्यातला सोमवारी संध्याकाळी कासारवडवली येथे झालेली मारहाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच आदेशाने झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. फडणवीसांना उद्देशून राऊत म्हणाले, ‘ ठाण्यातल्या बाजारबुणग्यांना आवरा. मनगटात रक्त असेल तर तिथे कारवाई करा. ठाण्यात एका महिलेवर १०० महिला येऊन हल्ला करतात. पोलीस आयुक्तांनी बांगड्या भरल्यात का? मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच हे होत आहे. महाराष्ट्रात आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत. पोलीस यंत्रणा त्यांची गुलाम आहे. जे बघ्याची भूमिका घेतायत , त्यांना सांगतो, ठाण्यात आम्हालाही घुसता येतं. आम्ही आलो तर ठाण्यात यांना घरात स्वतःला कोंडून घ्यावं लागेल, अशा इशारा राऊत यांनी दिलाय