मुलुंडच्या पोपटाला बातमी कळते तर भांडुपच्या पोपटाला का नाही? शिंदे गटाच्या आमदाराचा संजय राऊतांना सवाल

| Updated on: Mar 11, 2023 | 2:43 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ तसेच शिवसेनेचे सदानंद कदम यांच्या विरोधातील कारवाईनंतर संजय राऊत यांनी आज भाजप, शिंदे गटावर घणाघाती टीका केली.

मुलुंडच्या पोपटाला बातमी कळते तर भांडुपच्या पोपटाला का नाही? शिंदे गटाच्या आमदाराचा संजय राऊतांना सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर | 2024 मध्ये जनता या लफंग्यांना धडा शिकवेल. त्यांना रस्त्यावर उतरून मारेल, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गट तसेच भाजपाला (BJP) इशारा दिला. राऊत यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. औरंगाबादचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लोक आम्हाला मारणार नाहीत तर संजय राऊतला धडा शिकवतील, असं शिरसाट म्हणालेत. तर ईडीच्या कारवाईची बातमी आधी मुलुंडच्या पोपटाला कशी कळते, असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुलुंडच्या पोपटाला ही बातमी कळते मग शेजारी भांडुपच्या पोपटाला ही बातमी का कळत नाही, हे शोध म्हणावं… असा सल्ला शिरसाट यांनी दिलाय. संजय राऊत यांचं भांडुप येथे निवासस्थान असल्याने शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणा साधताना नाव न घेता भांडुपचा पोपट असा उललेख केलाय.

‘निर्दोष असाल तर सुटका होईल’

कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटेपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. तर रत्नागिरीतील खेड येथील सदानंद कदम यांनाही ईडीने ताब्यात घेत अटक केली आहे. या दोन्ही नेत्यांवर राजकीय सूडापोटी कारवाई होत आहे. हे दोघेही निर्दोष असल्याचं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. उद्धव ठाकरे यांची खेड येथील सभा यशस्वी करण्यात सदानंद कदम यांचा मोठा वाटा होता. त्याचाच वचपा काढण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप राऊत यांनी केला. यावरून संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, ‘ ईडीची कारवाई एका दिवसात होत नाही त्याला प्रोसेस असते. निर्दोष असल्याचा आव आणण्यापेक्षा केसला समोर जावं निर्दोष असाल तर सुटका होईल…

… तर संजय राऊत संपादक!

संजय राऊतने एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावे, अक्कलकोटचे लोक दर्शनाला बोलवून त्याला मारणार आहेत. संजय राऊत वेडा झालाय. त्याच्यावर उपचाराची गरज आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत ला स्टेनो म्हणून ठेऊन घेतले होते. शिव्या देण्याचा एखादा पेपर निघाला तर संजय राऊतला त्याचा संपादक केलं पाहिजे, असा खोचक निशाणा संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

संजय राऊतांची टीका काय?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात जे जे  सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर राजकीय सूडापोटी कारवाई केली जातेय, असा आरोप राऊत यांनी केला. तसेच सदानंद कदम यांच्यावर कारवाई होतेय, याची बातमी ईडीच्या अधिकाऱ्यांआधी मुलुंडच्या पोपटाला कशी कळते, असा सवाल करत राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला.