राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सांगलीतील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या लेकावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघा उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटलांवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.
रोहित पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ आणि तीन हजार रुपये वाटले जात असल्याचा गंभीर आरोप अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी केला आहे. याबद्दल आम्ही तक्रार करणार आहे. प्रांताधिकाऱ्यांना याबद्दल बोललो आहे. काही कार्यकर्ते देखील आले आहेत. इथे काही ताणतणाव होऊ नये म्हणून इथं आलो आहे. कार्यकर्त्यांना सांगितलं की पोलिसांचं काम पोलीस करतील. निवडणूक आयोगाचे निरिक्षकांकडेही तक्रार केली जाणार आहे. पैसे कुणी वाटले? कसे वाटले? किती पाकिटं होती. रोहित पाटील तिथं असताना पैसे वाटले जात होते. याची पोलिसांनी सविस्तर चौकशी करावी, असं संजयकाका पाटील यांनी म्हटलं आहे.
संजयकाका पाटील यांच्याकडून चौकशी करण्यात आल्यानंतर रोहित पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. हे असे आरोप मला बदनाम करण्यासाठी केले जात आहेत. विनाकारण माझं नाव या प्रकरणात घेतलं जात आहे. त्या व्यक्तीला चारचाकी गाडीत बसवलं गेलं होतं. त्याच्यावर दडपण टाकलं गेलं होतं. माझं नाव घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला गेला होता. व्हीडिओमध्ये दिसत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मी देखील पोलिसांना विनंती केलेली आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, असं रोहित पाटील म्हणालेत.
रोहित पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला पैशाच्या राजकारणाशिवाय दिसत नाही. सगळ्यात प्रामाणिक नेता म्हणजे आर आर आबा पाटील… रोहितचा सार्थ अभिमान आहे माझा विश्वास आहे कधीही रोहित चुकीचं काम करणार नाही. आर आर पाटील यांच्या कुटुंबाची मी माफी मागितली आहे. त्या गोष्टीचं मला दुःख झालं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणालेत.