सर्वात मोठी बातमी ! धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदात संभाजीराजेंचा खोडा?; अजितदादांकडे काय केली मागणी?

| Updated on: Dec 14, 2024 | 5:43 PM

संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती देशमुख कुटुंबाच्या सात्वनासाठी बीडमध्ये आले होते.

सर्वात मोठी बातमी ! धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदात संभाजीराजेंचा खोडा?; अजितदादांकडे काय केली मागणी?
Follow us on

काही दिवसांपूर्वी  बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे  सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. आधी त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती देशमुख कुटुंबाच्या सात्वनासाठी बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील मोठी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? 

राज्यात अशा घटना घडू लागल्या आहेत, महाराष्ट्र बिहारच्या वाटेवर चालला आहे का? पवनचक्कीच्या गोडाऊनवर सोनवणे यांना दमदाटी केली जात होती, हे विचारण्यासाठी संतोष देशमुख तिथे गेले होते. याचा राग मनात धरून त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. मात्र एवढं घडूनही पोलीस मजा पाहात राहिले, त्यातील एकाला आता निलंबित केलं आहे तर एकाला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. यात पीआयला देखील सह आरोपी करा अशी मागणी यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

पुढे बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. सुदर्शन घुले हा फरार आहे. हे कुठल्या पक्षाचे लोक आहेत यांचं अजित पवारांनी परीक्ष करावं. माजी मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालायला हवं होतं. आम्ही कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या प्रकरणात जातीनं लक्ष घाला. माझी अजितदादांना विनंती आहे की, तुमच्या पक्षाचे लोक आहेत, त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत या  मतदारसंघातील आमदाराला मंत्री करू नका, ही माझीच नाही तर येथील सगळ्या ग्रामस्थांची देखील भूमिका आहे.

तुम्ही इथे येऊन भेट द्यावी, या प्रकरणात सगळ्याच आमदारांनी आवाज उठवावा अशी माझी विनंती आहे, असं देखील यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.  तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी आणि त्यामध्ये जिल्ह्यातील एकही अधिकारी नसावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.