Suresh Dhas On Munni : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यातच आता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. आज पैठणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेवरही निशाणा साधला.
संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्याला शिक्षा व्हावी, यासाठी पैठणमध्ये काढलेल्या जनआक्रोश मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी अनेकजण मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत, असे विधान केले. त्यानंतर सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी नेमकी कोण, असा प्रश्न सातत्याने उपस्थितीत केला जात आहे. आता सुरेश धस यांनी मुन्नी नेमकी कोण, याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे.
“मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही. राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. मी जे बोललो आहे ते त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेले आहे. फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नी बदनाम अगोदरच झालेली आहे. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिये…, ही जी डार्लिंग आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे माझ्याकडे आहेत”, असे सुरेश धस म्हणाले.
यावेळी सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट का आणि कशासाठी घेतली, याबद्दल भाष्य केले. “अजित पवार आणि माझे वेगळे संबंध आहे त्यासाठी मी त्यांना भेटलो होतो. पतसंस्थांच्या घोटाळ्याबाबत प्रश्न घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. राजस्थानी मल्टीस्टेट बँकेचे प्रकरण आकाने आणि त्यांच्या आकाने केलेला आहे”, असे सुरेश धस म्हणाले.
“मला लक्ष्मण हाकेंवर काहीही बोलायचे नाहीत. दिशा भरकटवण्याचा हा प्रकार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय डायव्हर्ट करण्याचा लक्ष्मण हाके यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसे आहेत”, अशा शब्दात सुरेश धस यांनी टीका केली. “परळी तालुक्यातील 109 मृतदेह जे आहेत, पोलीस अधीक्षकांना मी विचारणार आहे याचा रेकॉर्ड काय आहे”, असाही मोठा आरोप सुरेश धस यांनी केला.