मगरपट्टा ते एफसी रोड, आकाकडे पुण्यात किती संपत्ती? सुरेश धसांनी सांगितलेल्या आकड्यानं खळबळ

| Updated on: Jan 09, 2025 | 2:52 PM

संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, या मोर्चामध्ये बोलताना पुन्हा एकदा सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत.

मगरपट्टा ते एफसी रोड, आकाकडे पुण्यात किती संपत्ती? सुरेश धसांनी सांगितलेल्या आकड्यानं खळबळ
Follow us on

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बोलताना सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस?

आकांनी भरपूर माल जमावला आहे, आका आंबानींना मागे टाकतात की काय अशी मला शंका आहे. आकांकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी आहेत. पुण्यातील मगरपट्ट्यात आकांनी एक अख्खा फ्लोअर विकत घेतला आहे. ज्याची किंमत मार्केटमध्ये 75 कोटी रुपये इतकी आहे, हा फ्लोअर आकाच्या चालकाच्या नावावर आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की मी याबाबत सर्व माहिती बिल्डरकडून मिळवली आहे. पुण्याच्या एफसीरोडवर आकाने सात दुकानं बुक केली आहेत, ज्या एका दुकानाची किंमत पाच कोटी रुपये आहे. आका शंभर टक्के 302 चा आरोपी आहे,  परळीत एका वर्षात तब्बल 109 मृतदेह सापडले,  त्यातील अनेक मृतदेहाची ओळख पटलेली नाहीये, आकाने मोठ्या आकाला जर फोन केला असेल तर त्याचाही नंबर येईल असंही यावेळी सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

आतापर्यंत सहा आरोपींना अटक 

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र एक आरोपी अजूनही फरार आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत. आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.