गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई : नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे ( MLA Saroj Ahire ) या आपल्या तान्हुल्यासह मुंबई येथे आजपासून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय ( Budget Session ) अधिवेशनासाठी दाखल झाल्या आहे. मात्र, यावेळी त्यांना मोठं दु:ख निर्माण झाले आहे. सरोज अहिरे या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही आपल्या तान्हुल्यासह हजर झाल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशभरात चर्चा झाली होती. सरोज अहिरे यांनी आई आणि लोकप्रतिनिधी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत असल्याचे चित्र पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. याच दरम्यान सरोज अहिरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटून कौतुक केले होते. आणि याच वेळी हिरकणी कक्ष सुरू करत असल्याची घोषणा केली होती.
नागपूर हिवाळी अधिवेशनात हिरकणी कक्ष अधिवेशनाच्या दरम्यान केला जाईल अशी भूमिका घेतली होती. मात्र आज सरोज अहिरे या आपल्या बाळाची तब्येत बरी नसतांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजर होत्या.
सरोज अहिरे या हिरकणी कक्षाकडे आपल्या बाळाला घेऊन जात असतांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, त्यावेळी हिरकणी कक्षाची स्थिती पाहता सरोज अहिरे बाहेर आल्या. तिथे फक्त हिरकणी कक्ष बोर्ड लावला असल्याचे म्हंटले आहे.
हिरकणी कक्षात कुठेही बाथरूमची सुविधा नाही. सगळीकडे धूळ असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे हिरकणी कक्षाची घोषणा करून उपयोग नाही, सार्वजनिक शौचालय येथे जाऊन त्यांनी हात धुवून बाळाला घेतल्याचे म्हंटले आहे.
माझ्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी इथे आलेले असतांना मला जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तशी सुविधा मला उपयोगाची नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले पत्र सुद्धा माझ्याकडे आहे म्हणत सरोज अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हिरकणी कक्ष तुम्हाला लखलाभो म्हणत सरोज अहिरे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. मी कधीही अधिवेशन बुडविले नाही पण जर अशी सुविधा असेल तर मी इथून निघून जाईल अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
एकूणच नागपूर अधिवेशनात आई आणि लोकप्रतिनिधी अशी दुहेरी भूमिका साकारतांना दिसलेल्या सरोज अहिरे या तशाच स्वरूपात मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिसल्या आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. मात्र, यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित करत नाराजी यवक्त केल्याने संपूर्ण सभागृहात चर्चा होऊ लागली आहे.