LOKSABHA ELECTION 2023 : सातारा लोकसभा अजित पवार गट लढणार? उदयनराजे यांचे काय? चलबिचल सुरु

| Updated on: Dec 06, 2023 | 11:50 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या जागा आपण लढवणारच आहोत असे विधान केलंय. त्यामुळे महायुतीमध्ये धुसफूस सुरु झालीय.

LOKSABHA ELECTION 2023 : सातारा लोकसभा अजित पवार गट लढणार? उदयनराजे यांचे काय? चलबिचल सुरु
SATARA LOKSABHA ELAECTION UDYANRAJE BHOSALE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

संतोष नलावडे, सातारा | 6 डिसेंबर 2023 : सातारा लोकसभा आम्हीच लढवणार अशी भूमिका अजितदादा गटानं घेतली. त्यामुळे साताऱ्यामध्ये त्यांच्या मित्र पक्षांमध्ये चलबिचल सुरू झालीय. शिंदे गट आणि भाजपच्या समर्थकांनी सुद्धा सातारा लोकसभेवर आपापल्या पक्षाची दावेदारी सांगितली. साताऱ्याची जागा अजितदादा गटाकडे गेली तर मग उदयनराजे याचं काय? याचीही चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या उदयनराजेंनी अद्याप आपली भूमिका मांडलेली नाही. मात्र, सत्तेत गेल्यापासून अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर साताऱ्याच्या जागेवरून नाव न घेता उदयनराजेंना इशारा देत आलेत. यामुळे भाजप आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू झालेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या जागा आपण लढवणारच आहोत असे विधान केलंय. त्यामुळे महायुतीमध्ये धुसफूस सुरु झालीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप करायचं आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

अजित दादा यांच्या भुमिकेनंतर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप पदाधिकारी यांनीही या जागेवर आपला दावा सांगितला आहे. 2019 मधल्या निवडणुकीमध्ये सातारा लोकसभेमध्ये राष्ट्रवादीकडून उदयनराजे तर शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांमध्ये लढत झाली. नरेंद्र पाटील यांना चार लाख बावन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव तर राष्ट्रवादीच्या उदयनराजे यांना पाच लाख एकोणऐंशी हजार सव्वीस मतं मिळाली. उदयनराजे तब्बल एक लाख सव्वीस हजार मतांनी निवडून आले.

नंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना उदयनराजे यांनी भाजपची साथ धरली. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लागली. भाजपनं उदयनराजेंना तर राष्ट्रवादीनं श्रीनिवास पाटलांना तिकीट दिलं. सहा महिन्यांपूर्वी सव्वा लाख मतांनी जिंकलेले उदयनराजे नंतर 87,000 हजार मतांनी पराभूत झाले.

आता शिवसेनेचा एक गट आणि राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत आणि विरोधी बाकांवर सुद्धा आहे. गेल्या वेळचे भाजपचे उमेदवार म्हणून उदयनराजेंचा दावा या मतदार संघावर आहे. तर, पारंपरिक राष्ट्रवादीची जागा म्हणून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची दावेदारी आहे. २०१९ ला शिवसेना लढली म्हणून शिंदे गट ही साताऱ्यातून लढण्यासाठी आग्रही आहे. त्यात सातारा आम्हीच लढणार असं अजित पवारांनी म्हटल्यान साताऱ्यातील शिंदेगट आणि भाजपमध्ये चलबीचल झालीय.

राष्ट्रवादीची दावेदार आणि अजित दादा गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यात कोणाला सित मिळेल हे माहित नाही. पक्ष पातळीवर आणि कोणाला मिळणार नाही हा मुद्दा आमच्या बऱ्याच जणांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पण, आम्हाला आमच्या जिल्ह्यात कोण नकोय हे पक्क माहिती आहे. एक माझं ब्रम्हवाक्य लक्षात ठेवा की कोण नकोय. असे म्हणत या चर्चांना अधिक रंग दिलाय. ते सोबत नसतानाही खासदार एक लाख मतांनी निवडून आलेला आहे. त्यामुळे कुणाच्या असल्यानं आणि कुणाच्या नसल्यानं खूप मोठा फरक पडतो असा विषय नाही, असा टोलाही त्यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता लगावलाय.