“मुख्यमंत्र्यांना उचलायचं, टाकून द्यायचं हे राजकारण योग्य नाही”; भाजपच्या राजकारणावर काँग्रेस नेत्याची खोचक टीका

| Updated on: Apr 20, 2023 | 8:20 PM

महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम सरकारचा आहे. त्यामुळे आलेल्या लोकांची सोय करणे ही सरकारची जबाबदारी होती, मात्र त्यांनी ती झटकून देऊन आप्पसाहेब धर्माधिकारी यांचे नाव पुढं केलं आहे असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांना उचलायचं, टाकून द्यायचं हे राजकारण योग्य नाही; भाजपच्या राजकारणावर काँग्रेस नेत्याची खोचक टीका
Follow us on

सातारा : खारघरमधील आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्माघाताच्या त्रासाने अनेक लोकांचा मृ्त्यू झाला. त्यामुळे विरोधकांनी सरकारला जबाबदार धरत काँग्रेसच्या नाना पटोले यांनी सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्या दुर्घटनेवरूनच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरले आहे.कार्यक्रमाला आलेल्या निष्पाप लोकांचा सरकारच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव गेल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

या कार्यक्रमाच्या वेळेविषयी बोलताना सत्ताधाऱ्यांनी सांगितले की, हा कार्यक्रम आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वेळेप्रमाणे ठरवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, सरकार आपली चूक झाकण्यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव पुढं केले जात आहे. मात्र महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम सरकारचा आहे. त्यामुळे आलेल्या लोकांची सोय करणे ही सरकारची जबाबदारी होती, मात्र त्यांनी ती झटकून देऊन आप्पसाहेब धर्माधिकारी यांचे नाव पुढं केलं आहे असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

तर दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आपल्या 40 आमदारांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

या अशा प्रकारच्या वावड्या भाजपचीच माणसं करत असल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कधी अजित पवार यांचे नाव घ्यायचे तर कधी काँग्रेसमधील नेत्यांची नावं घेऊन आपले अपयश झाकण्यासाठी अशा वावड्या भाजपच उठवत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

सध्याच्या राजकारणात भाजप विविध टप्प्यावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षांतराच्या वावड्या उठवल्या जात आहेत. आपले अपयश झाकण्यासाठी हे असे प्रकार केले जात आहेत.

तसेच सध्या भाजपविषयी लोकांच्या मनात एक प्रकारची नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे. त्यामुळे या दृष्टचक्रातून भाजपला बाहेर पडायचे असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, अजित पवार भाजपसोबत जाणार अशा वावड्या उठवायच्या आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, भाजप वेगळ्या पद्धतीने राजकारण करत आहे. खारघरच्या कार्यक्रमादिवशी गृहमंत्री अमित शाह यांचा गोव्यात कार्यक्रम होता.

त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी हा दुपारच्या उन्हात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  भाजपकडून आता मुख्यमंत्र्याविषयीही वेगळे राजकारण केले जात आहे.

एका मुख्यमंत्र्याला उचलायचे आणि दुधातील माशी बाजूला करतात त्याप्रमाणे फेकून द्यायचे हे राजकारण योग्य नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.