सातारा : ऊसतोड कामगाराची मुलगी जर्मनीला जाणार आहे. भारताच्या संघाकडून ती हॉकी स्पर्धा खेळणार आहे. २१ वर्षीय काजल आटपाडकर असं तीचं नाव. १८ ते २३ ऑगस्टदरम्यान जर्मनीत चार राष्ट्रांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. काजल आटपाडकर ही सध्या छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा प्रबोधिनीत क्रीडा प्रशिक्षण घेत आहे. तिची जर्मनी येथे होणाऱ्या चार राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. काजल हिची परिस्थिती हालाखीची आहे. असे असतानादेखील प्रतिकूल परिस्थितीवर तिने मात केली. हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघात सज्ज झालीय. याचे कौतुक दुष्काळी मान तालुक्यासह सातारा जिल्ह्यात होतंय.
काजल हिचे आई-वडील अत्यंत सामान्य कुटुंबातील. सहा महिने ऊसतोडण्याचे काम करतात. तर, इतर सहा महिन्यांत घराची, विहीर खोदकाम करतात. अशाप्रकारे काजलचे पालक सध्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
काजलच्या कुटुंबात पाच बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे. काजल ही बहिणींमध्ये सर्वात छोटी. पहिल्यापासूनच काजलला खेळामध्ये खूप आवड होती. तिच्या गावातील प्राथमिक शाळेतील शिक्षिक दाम्पत्य संगीता जाधव आणि चंद्रकांत जाधव यांनी तिच्यातील गुण ओळखले. तिला स्वतःजवळ ठेवले. सकाळी लवकर उठून तिच्याकडून सहा महिने धावण्याचा सराव घेतला.
जिल्हा परिषदेच्या वतीने विविध ठिकाणी खेळांचे कॅम्प भरवले जात होते. यामध्ये काजलला नेहमी सहभागी केले जायचे. माणदेशी चॅम्पियन्समधील प्रशस्त क्रीडांगणात जिल्हा परिषद यांच्या वतीने कॅम्प घेण्यात आला होता. यावेळी माण देशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा यांनी काजल आटपाडकर यांच्याकडे विशेष लक्ष दिले.
शासकीय क्रीडा प्रबोधनीत काजलला प्रवेश मिळाला. क्रीडा क्षेत्रातील शिक्षणास तिला चालून संधी आली. काजल आटपाडकर ही उत्तम खेळाडू आहे. त्यामुळे तिला सध्या देश-विदेशातील क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते.
काजलने या संधीचा फायदा घेत यशही संपादन केलंय. सध्या जर्मनीमध्ये हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या वतीने झालेल्या निवडीबाबत तिचे आई नकुसा-वडील सदाशिव समाधानी आहेत. काजलसाठी आमचे कायम पाठबळ राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.