सांगली – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वक्रदृष्टी आता, सांगलीतल्या जत तालुक्यातील 40 गावांवर पडलीय. जत तालुक्यात दुष्काळी गावात आम्ही पाणी पोहोचवलं. त्या 40 गावातल्या ग्रामपंचायतींनी कर्नाटक येण्याचा प्रस्ताव केला होता. त्यामुळं त्या गावांना कर्नाटकात घेण्यासंदर्भात विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांनी म्हटलंय…
बेळगाव, कारावार, निपाणीसह इतर मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामिल करण्यावरुन सुप्रीम कोर्टात न्यायालयीन लढा सुरु आहे. त्यातच आता सांगलीतल्या 40 गावांकडे कर्नाटकनं नजर टाकल्यानं, पुन्हा राजकारण तापलंय.
पाण्याच्या प्रश्नावरुन 2012 मध्ये जत तालुक्यातल्या 40 गावांनी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला इशारा दिला होता. 2009 पासून जत तालुक्यात दुष्काळामुळं पाण्याची भीषण समस्या होती. पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी सरकारकडे ग्रामस्थांनी विनंतीही केली. मात्र पाण्याचा प्रश्न निकाली निघत नसल्यानं कर्नाटकात जाण्याचा 40 गावांनी इशारा दिला होता. सध्या म्हैसाळ योजना 50 % पूर्ण झाली असून पाण्याचा प्रश्न निकाली निघतोय.
आता हाच दाखला देत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई जत तालुक्यातल्या 40 गावांवर दावा करत आहेत पण मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी बोम्मई यांना ठणकावत, एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नसल्याचं म्हटलंय. म्हैसाळ योजनेद्वारे गावांमध्ये पाणी येतंय, त्यामुळं आता कर्नाटकात जाण्याचा प्रश्नच नाही, असं गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय…
कर्नाटकची महाराष्ट्रातल्या गावांवर वक्रदृष्टी पडत असली तरी तरी खुद्द गावकऱ्यांनी कर्नाटकात जाणार नसल्याचं सांगून, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची हवा काढलीय.