भय इथले संपत नाही, कोरोनाचा पुन्हा उद्रेक, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात मास्कसक्ती

| Updated on: Apr 03, 2023 | 10:49 PM

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासानाची धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा नवा व्हेरियंट राज्यातील तब्बल सहा जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन चांगलंच कामाला लागलं आहे.

भय इथले संपत नाही, कोरोनाचा पुन्हा उद्रेक, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मास्कसक्ती
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Maharashtra Corona Update) पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. कोरोनाने दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगात हाहाकार उडवून दिला होता. त्यानंतर कोरोना संक्रमणाचं प्रमाण कमी-अधिक प्रमाणात होतं. पण राज्यात पुन्हा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झालाय. आरोग्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर लगेच सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालये, बँका, शाळांसाठी आदेश जारी केला आहे.

राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी आणि उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात कोरोनाची नेमकी परिस्थिती काय?

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात दररोज 500 पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पण सुदैवाने आज त्या मानाने कमी रुग्णांची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 248 नवे रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रोजच्या नव्या रुग्णांचा आकडा हा 500 पुढे जाताना दिसतोय. पण त्या तुलनेत आजच्या नव्या रुग्णांची नोंद ही कमी आहे. राज्यात सध्या 3 हजार 532 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

आरोग्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मी आवाहन करतो की, ताप, खोकला, सर्दी अंगावर काढू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोना असेल तरी 48 ते 72 तासात रुग्ण बरा होतो. महापालिका स्तरावर पूर्ण तयारी आहे. घाबरायचे कारण नाही”, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं.

“आता यात्रा, उरूस सुरु होतील. जोखमीचे पेशंट असतील त्यांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे. जाताना मास्क वापरा जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात राहील. हा घाबरणारा व्हेरियंट नाही. जनतेने घाबरण्याचे कारण नाही. जनतेला कळकळीचे आवाहन आहे की पर्यटन, लग्न, यात्रेत जाताना काळजी घ्यावी”, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.

“या व्हेरियंटची 6 जिल्ह्यांमध्ये वाढ झालीय. सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. याच ठिकाणी स्प्रेडर आहेत. पण एकही रुग्ण व्हेंटिलेटर किंवा आयसीयूत नाही”, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

“मास्क वापरण्याची सक्ती राज्यात नाही. आम्ही आवाहन करत आहोत ज्याला त्रास होतोय त्यांनी मास्क वापरावा. आम्ही जे कोविड रुग्णालय होते, ते सुसज्ज करत आहोत. पुन्हा मॉक ड्रिल केले जाईल. लसींचा पुरवठा पूर्ववत केला जाईल”, असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.