राज ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात आर्थिक आरक्षणाची भूमिका जाहीर केली. आर्थिक निकषावर सर्वांना आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर मराठा आंदोलक त्यांच्यावर नाराज झाले. आता राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्यावर टीका केली. त्यांनी मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट केली.
तुमचे विचार लादू नका
राज साहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा काय गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे. जे त्यांना वैभव मिळाले गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालेले आणि श्रीमंताला आरक्षणाची किंमत नाही. राज ठाकरे यांनी या गोरगरीब जनतेची भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग मला तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, हे ठरवा. विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थ्यांना विचारातून आरक्षण ची गरज आहे का ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा. प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही. तुमचे विचार लादू नका, असे आवाहन त्यांनी राज ठाकरे यांना केले.
आंदोलनकर्त्यांना आवाहन
राज्यात कुठे पण मराठा समाजाचे आंदोलन सुरू नाही. कुणाला ही अडवू नका. कुणाला जाब विचारू नका. विनाकारण गालबोट लावायचा प्रयत्न करु नका. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकाऱ्यांनी असे आंदोलन करण्यासाठी षडयंत्र चालवल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन करायचा की नाही हा शेवटी त्यांचा विचार आहे. समाजाने इतके दिवस सहन केले. पण ते जर समाजाचे ऐकणार नसतील तर त्यांनी विचार करावा, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.
फडणवीसांनी तयार केल्या टोळ्या
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी वेगवेगळ्या टोळ्या तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आंदोलनाविरोधात सर्वात अगोदर येवल्याचा मुकादमाला कामाला लावले, त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्यामार्फत काही जणांमध्ये फूट पाडली. आता त्यांना नारायण राणे यांच्या आडून आंदोलन सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. गरीब मराठ्यांविरोधात हे प्रकार का करत आहेत, असा सवाल त्यांनी केला. मराठा आरक्षणामुळे सत्ताधाऱ्यांना विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी पुन्हा सांगितले. तर मुंबईतील परिस्थितीविषयी आताच भाष्य करणार नसल्याचे ते म्हणाले.