मुंबईः महत्वाच्या पदावर असलेल्या लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची वेगवेगळ्या पद्धतीने अवहेलना होत असते. तरीही त्याबद्दल कोणीही भूमिका मांडत नाही. महाराजांची अवहेलना केली म्हणून त्याबद्दल वाईटही का वाटत नाही असा सवाल भाजपचे खासदार उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर केला आहे. भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्यव्य केल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आणि राज्यपाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
राजकीय पटलावर छत्रपती शिवाजी महाराज वापरता मग त्यांची अवहेलना का करता असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, आता आपल्याला राज्यातील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या भावना आपल्याला पोहचवल्या आहेत.
त्यामुळे येत्या 3 डिसेंबर रोजी रायगडावर समाधी स्थळावर जाऊन प्रतिकात्मक लोकांचा आक्रोश, वेदना त्या ठिकाणी व्यक्त केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांबाबत आपण राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची अवहलेना थांबवू शकत नसाल तर तु्म्ही शिवाजी महाराजांचे नावही घेऊ नका टोला त्यांनी लगावला आहे.
खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणाऱ्या अवहेलना अवमानाबद्दल बोलताना सांगितले की, तुम्हाला हे जर बंद करता येत नसेल.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलत असतील तर तुम्ही त्यांचे नावही घेऊ नका अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. त्यामुळे या पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची अवहेलना, त्यांची बदनामी केली गेली तर मात्र आम्ही शांत बसणार नाही.
त्यामुळे यानंतर आम्ही 3 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर जाऊन आम्ही विचार मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.