“लोकांमध्ये राहिल्याने त्यांनी आजारपणालाही निवृत्त केलं”; राष्ट्रवादीच्या आमदाराने शरद पवारांची ताकद दाखवून दिली

| Updated on: May 02, 2023 | 6:55 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली असली तरी, त्यांचा हा निर्णय राज्यासह देशातील कोणत्याच नेत्याला मान्य नाही.

लोकांमध्ये राहिल्याने त्यांनी आजारपणालाही निवृत्त केलं; राष्ट्रवादीच्या आमदाराने शरद पवारांची ताकद दाखवून दिली
Follow us on

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज आपल्या राजकारणातील निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षातील अनेक नेत्यांना हा धक्का बसला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केली आहे. सातारा येथील कार्यकर्त्यांनाही शरद पवार यांच्या या निर्णयाचा धक्का बसला असल्याने त्यांनीही आता आपापल्या पदाचा आम्ही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील आणि देशातील जनतेने शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले आहे.

त्यामुले त्यांच्या नेतृत्वाच्या निवृत्तीचा विचार जनता करणार आहे. हा विचार शरद पवार यांनी करू नये असं आपले स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, शरद पवार यांनी प्रकाशनादरम्यान घेतलेला निर्णय ज्या प्रमाणे नेत्यांसाठी धक्कादायक आहे. त्याच प्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठीदेखील हा निर्णय धक्कादायक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

वयोमानामुळे निवृत्तीचा निर्णय घेणं याचा कोणाला विश्वास बसत नाही, मात्र ते कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत. लोकांमध्ये राहिल्यामुळे त्यांनी आजारपणाला सुद्धा निवृत्त केलं आहे. शरद पवार आणि अध्यक्षपदाचं हे समीकरण, ओळख आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा असे इच्छाही आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली असली तरी, त्यांचा हा निर्णय राज्यासह देशातील कोणत्याच नेत्याला मान्य नाही. त्यामुळे आता राज्यासह देशातील नेत्यांकडूनही त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा असं मत व्यक्त केले जात असल्याचे मत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.