देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात साताऱ्याच्या जागेवर कोण उमेदवार असणार? याची जोरदार चर्चा रंगली होती. अशातच साताऱ्याचे कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. बिचुकले हे उद्या म्हणजेच 19 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत अभिजीत बिचुकले यांनी टीव्ही 9 मराठीला माहिती दिली. यावेळी उदयनराजे यांची भूमिका आणि त्यांच्या उमेदवारीवरही बिचुकले यांनी भाष्य केलं आहे. भाजपचं नाव घेत अभिजीत बिचुकले यांनी जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रातील मतदारराजा हा जागृक आहे. येत्या 19 एप्रिल ला मी अर्ज भरणार आहे. भाजपमध्ये उमेदवारी मिळावी ही उदयनदादांची इच्छा होती. ती पूर्ण झाली पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचं आत्मपरीक्षण उदयनराजेंनी करावे आणि लोकांनी याचं पण आत्मपरीक्षण करावं, असं बिचुकले म्हणालेत.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या ही मागणी केली होती. यामुळे मी संपूर्ण बहुजन समाजाला सांगू इच्छितो, तुमचा बहुमोल मत मला मिळालं. तर समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक होण्याबाबत मी पाठपुरावा करणार आहे. वैचारिक वारस म्हणून सर्व जनतेने माझ्या पाठीशी उभं राहण्याचं धाडस केलं पाहिजे, असं आवाहन अभिजीत बिचुकले यांनी केलं आहे.
शक्ती प्रदर्शन म्हणजे काय असतं शक्ती ही युद्धात दाखवायची असते. दोन रुपयाची दारू पाजून मटन देऊन, शक्ती प्रदर्शन केलं जात नाही. शरद पवार आणि उदयनराजे हाडवैर आहे. मी सगळ्यांमध्ये एकटा लढतोय. यामुळे मला एकदा संधी द्या, असं बिचुकलेंनी म्हटलं.
शिवेंद्रराजेंचे वडील अभयसिंग राजे भोसले यांच्यावरही त्याकाळात लोकसभेला शरद पवारांनी खर्च केला होता. त्याच्यापेक्षा जास्त उदयनराजेंवर केला होता यामध्ये मला बोलायचं नाही. उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांना त्यांची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मी माझी मते मांडत आलो. सध्या उदयनराजेंना पाडण्यासाठी जयंत पाटील शरद पवार प्रयत्न करत आहे यावेळी जनतेने मला संधी द्यावी, असं अभिजीत बिचुकले म्हणालेत.