मुंबई : साताऱ्यातील माण तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेल्या मलवडी या ऐतिहासिक गावात हजारो भाविकांचे कुलदैवत आणि श्रध्दास्थान असलेल्या श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी देवीची यात्रा (Satara Khandoba Yatra) उत्साहात पार पडली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मलवडी गावचे श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव रद्द करून खंडोबाची आणि महालक्ष्मीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.
खंडोबाच्या यात्रेमध्ये कोरोना नियमांचे पालन
येळकोट येळकोट जय मल्हार… लक्ष्मी आईच्या नावानं चांगभलं… या जय घोषात भंडाऱ्याची उधळण करत ही यात्रा उत्साहात पार पडली. या गावातील मल्लू नावाच्या धनगराची श्री खंडोबावर अपार श्रध्दा होती. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होवून देवाने त्यास वरदान मागण्यास सांगितले होते आणि देव प्रकट झाले या आनंदाच्या भरात मल्लूचा मृत्यू झाला होता. तो दिवस मोक्षदा एकादशीचा होता म्हणूनच या तिथीला श्री खंडोबाची यात्रा भरते.
ग्रामस्थांनी पालखीतून मिरवणूक काढली
खंडोबाचा रथोत्सव पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र, यावर्षी खंडोबाची पालखीतून मिरवणूक काढून मागील वर्षापासून शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करत ही यात्रा साध्या पद्धतीने ग्रामस्थांनी भरवली होती. श्री खंडोबाच्या हळदी मलवडी येथे लग्न पाली येथे आणि वरात जेजुरी येथे काढण्यात येते. त्यामुळे मलवडीच्या या यात्रेला खुप मोठे धार्मिक महत्व आहे. विशेष म्हणजे या यात्रेमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले होते.
संबंधित बातम्या :
VIDEO : बैलगाडीतून नवरी निघाली लग्नाला, इंदापूर तालुक्यातील अनोखा लग्न सोहळा…