सातारा : मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक शाळा आहेत. मोठ्या शहारांमध्ये मराठी, उर्दू, हिंदी ते इंग्रजी अशा वेगवेगळ्या माध्यमांतील शाळा आपण बघितल्या आहेत. पण गाव-खेड्यांमध्ये आजही शेतकऱ्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षण देतात. जिल्हा परिषदेची शाळा माणुसकी जपायला शिकवते, योग्य संस्कार लावते. या शाळा, शाळेचे शिक्षक आणि शाळेचा परिसर विद्यार्थ्यांना इतकं सारं काही देतात की ते विद्यार्थ्यांना आयुष्यभर पुरेल. देशातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळांमध्ये झालं आहे. अर्थात फक्त जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच या सुविधा मिळतात, असं नाही. पण जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बऱ्याचदा गरीब कुटुंबातले असतात.
विशेष म्हणजे शाळेचे शिक्षक ही शाळा जपतात आणि विद्यार्थ्यांमध्ये योग्य संस्कार रुजवतात. जिल्हा परिषदेच्या अशाच एका शाळेची आणि शाळेच्या विद्यार्थ्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही शाळा खरंतर दुष्काळी भागातील आहे. पण दुष्काळी भागातही जिल्हा परिषदेच्या शाळेच्या एका शिक्षकाने उल्लेखणीय कामगिरी केली आहे. काहीतरी करुन दाखवण्यासाठी तुम्ही जगाच्या कुठल्या कोपऱ्यात राहतात हे महत्त्वाचं नाही. तर तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. साताऱ्यातील एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने तशीच कौतुकास्पद कामगिरी करुन दाखवली आहे.
सातारा जिल्ह्यात कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात जिल्हा परिषद शाळा विजयनगर येथील बालाजी जाधव या शिक्षकाने या ग्रामीण भागातल्या शाळेतील इयत्ता 1 ली ते 4 थी च्या 40 विद्यार्थ्यांना चक्क जपानी भाषा शिकवली आहे. समाजातील खूप सारे तरूण पदवीनंतर परदेशात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्या देशाची भाषा अवगत नसल्याने त्यांना ही संधी मिळत नाही. पण विजयनगरच्या ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना भविष्यात ही समस्या उद्भवू नये म्हणून शिक्षक बालाजी जाधव यांनी प्राथमिक शाळेतच जपानी भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
अगदी काही महिन्यात या शाळेतील विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, संवाद, गणिते व दैनदिन संवाद साधण्यात तरबेज झाले आहेत. या भाषेतून विद्यार्थी बोलत असताना पालकांना देखील याचं कौतुक वाटत आहे. यामुळे सध्या जपानी भाषेतील शिक्षण देणारी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतील ही पहिलीच शाळा म्हणावी लागेल. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात याचा खूप मोठा लाभ होईल, अशी खात्री बालाजी जाधव या शिक्षकाने केली आहे.