आमदारसाहेब, तुम्ही कार्यकर्त्यांचे राहिला नाही, ठेकेदारांच्या गराड्यात…; अजित पवार गटाच्या नेत्याला पत्र

| Updated on: Sep 22, 2024 | 11:22 AM

NCP Karykarta wrote a letter to MLA Makarand Patil : अजित पवार गटाच्या नेत्याला कार्यकर्त्याने पत्र लिहिलं आहे. यात अजित पवार गटाच्या आमदारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हे पत्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे. वाचा सविस्तर...

आमदारसाहेब, तुम्ही कार्यकर्त्यांचे राहिला नाही, ठेकेदारांच्या गराड्यात...; अजित पवार गटाच्या नेत्याला पत्र
अजित पवार
Follow us on

विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत. साताऱ्यातील वाई विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना एका अज्ञात कार्यकर्त्याने पत्र लिहिलं आहे. या पत्रात मकरंद पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मकरंद पाटलांना इशारा देणारं पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. मकरंद पाटील पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. आधी त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्ते पाहायला मिळायचे. पण सध्या ते ठेकेदारांच्या गराड्यात जास्त पाहायला मिळत आहेत, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या पत्रातील मजकूर

नमस्कार आबा….

आबा पत्र लिहिण्यास कारण की, आबा तुमची काळजी वाटतेय. आज लिहितोय त्याचं कारण आबा कोरोना काळात माझ्या आईला बेड नव्हता तो तुम्ही दिलात. आबा खरंच तुमची फार काळजी वाटतेय, आणि माझं दुर्दैव आबा की मी हे पत्र निनावी लिहितोय. त्याचं कारण ज्या माझ्या भावना आहेत. त्याच भावना तुमच्यावर अपार प्रेम करण्याऱ्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांचा आहेत. आबा तुम्ही जी मलिदा गॅंग गावगाड्यात सांभाळताय. त्यांना मला दुखवायचं नाही. पण यांनी आबा तुम्हाला पुरतं घेरलंय. आणि हे पत्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं वाटतंय.

आबा आपला पहिल्यांदा पराभव झाला. पाम आबा जिथं आपल्याला लोकांनी साथ दिली नाही. तिथून आपण काम चालू केल. आणि त्यानंतर आबा सलग तीन वेळा तुम्ही निवडून आलात. एकदा अपक्ष आणि दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तुम्ही निवडून आलात. पण आबा हल्ली चित्र वेगळं दिसतंय. आता तुम्ही जेव्हा तीन तालुक्याचा दौरा करता आबा लोकांना भेटता त्यावेळी कट्टर कार्यकर्ते कमी आणि तुमच्या अवतीभवती स्वतःचा फायदा पाहणारे तुमच्यासोबत जास्त दिसतात. आबा तुमचे हाडाचे कार्यकर्ते या गर्दीत दिसत देखील नाहीत.

आबा हल्ली काळ बदललाय आणि तुम्ही देखील बदलायला लागलाय. गावगाड्यातील प्रत्येक गावागावातील मलिदा गँग आणि ठेकेदार तुम्हाला चुकीची माहिती द्यायला लागलेत. आणि जो आबा आमच्या गरीबाच्या झोपडीत जेवण करून जात होता त्या आबाला भेटायला पण आता आम्हाला गर्दीत उभे राहावे लागतेय. आबा आपले नितीन काका खासदार झाले खूप आनंद झाला. पण काकांना शुभेच्छा देताना पण आम्हाला ठेकेदारांच्या मागे उभ राहावं लागले. आबा मला माफ करा मी तक्रार पण करतोय पण तुमचं बदललेलं वागणं मला खरंच पटत नाहीये. पण आबा तुमचं राजकारण आणि तुमचा मतदार हा सामान्य माणूस आहे. तुम्ही विसरायला लागलाय आबा.

आमचा आबा आमच्यासाठी मुख्यमंत्र्यापेक्षा कमी नाहीत. वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघ तसा भौगोलिक दृष्ट्या अवघड मतदारसंघ आहे आबा. पण एका बाजूने नितीन काका दुसऱ्या बाजूने मिलिंद दादा आणि तुम्ही हा मोठा मतदार संघ काबीज केलात. आम्ही तर अभिमानाने आबा म्हणतो आमचा आमदार परमनंट आहे. आणि आमचा आमदार परमनंट यासाठी आहे की तू सामान्य जनतेचा आमदार आहे. तो जननायक आहे. पण आता हळूहळू आमचा जननायक ठेकेदारांच्या अजंड्यावर काम करायला लागलाय की काय? असा देखील प्रश्न आबा माझ्या मनात नेहमी येतो. पण आबा काहीही झालं तरी पुन्हा एकदा वाई खंडाळा महाबळेश्वरचा जननायक आमदार होणारा हा माझ्या मनात विश्वास आहे. पण तुम्ही तुमचं मूळ राजकारण विसरायला लागलात की काय? सामान्य माणसापेक्षा तुम्हाला ठेकेदार महत्त्वाचे वाटतात की काय? तुम्ही गाव भेट दौरा देत असताना तुमच्या पायाला हात लावणारे तुम्हाला मोठे वाटायला लागली की काय?

आबा तुम्हाला आठवतेय तुम्ही एक गाव ओलांडल्यानंतर दुसऱ्या गावात तुम्ही जाताना दरवेळी तुमच्या बरोबर वेगवेगळ्या व्यक्ती असायचा. पण आज काय परिस्थितीय आबा प्रत्येक गावात तुम्ही आल्यानंतर तुमच्या सोबत पहिल्यांदा ठेकेदार दिसतो. आणि हे चित्र पाहिल्यानंतर आबा खरंच मनाला वेदना होतात. आबा तुम्ही कधीही कुणाचा द्वेष केलेला मी कधीच पाहिलं नाही. विरोधकाला देखील आपलंसं करणारा तुमचं नेतृत्व आहे. आज आपल्यावर अशी वेळ का आली आबा. पुन्हा एकदा सामान्य माणसाला सोबत घेऊन आपण ठेकेदारांना बाजूला सारा. यावेळी देखील आबा आपल्याला मागचं रेकॉर्ड ब्रेक करून विधानसभेची निवडणूक जिंकायचीय. त्यासाठी आपण सगळे मिळून रक्ताचे पाणी करू आबा. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्या जे मनात आलं ते लिहिलय आबा.

तुमचाच एक सामान्य कार्यकर्ता.