लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. माढा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेसाठी शरद पवार आज सकाळी दहिवडीत होते. इथे त्यांची सभा झाली. त्यानंतर आता सातारा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ साताऱ्याच्या पाटणमध्ये शरद पवार जाहीर सभा होतेय. या सभेला शरद पवार संबोधित करत आहेत. या भाषणात शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
सातारा जिल्हा देशाचा आगळा वेगळा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील लोकांणी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. यशवंतराव चव्हाण यांना भारत भूषण द्या, अशी मागणी होतं आहे. त्याचा आनंद आहे. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे. चव्हाण यांचं स्मारक मुंबईत आहे. संसदेतही चव्हाण यांचा फोटो आहे. अशा अनेक गोष्टी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची नोंद व्हावी, यासाठी केल्या आहेत. पण हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून आम्ही केला नाही, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी पाटणच्या सभेत नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या राज्यात महागाई वाढली. भारतात 100 पैकी 87 तरुणांना काम नाही. स्वतः काय केलं ते मोदी सांगत नाहीत, असं म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान पाटणमधील सभेच्या भाषणाच्या शेवटी शरद पवार यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली.
शशिकांत शिंदे यांनीही या सभेत भाषण केलं. लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. वातावरण चांगलं झालं आहे. निवडणुकीत राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेविरोधात असलेला रोष दिसून येत आहे. आम्ही गादीचा मान ठेवला. तीन वेळा खासदार केलं. छत्रपतींच्या स्मारकाचं काय झालं?, असा सवाल शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
काल रात्री नोटीस आली आणि आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. शरद पवारसाहेब तुमची शपथ घेऊन सांगतो, अण्णासाहेब पाटील, शिवाजीराव पाटील यांच्यानंतर शरद पवार यांनी माथाडीसाठी काम केलं. एक केस दोन केस अजून कितीही केसेस टाका मरेपर्यंत शरद पवार यांची साथ सोडणार नाही. उद्या काय व्हायचं ते होऊ देत.. पण निवडणुक लढा की सर्वजण लक्षात ठेवा, असं शशिकांत शिंदे म्हणाले.