सातारा : गेल्या दोन वर्षापासून ठाकरे (Cm Uddhav Thackeray) सरकार पडण्याचे अनेक मुहूर्त भाजपकडून काढण्यात आले आहेत. भाजपने (Bjp) काही दिवसांपूर्वीच आता पुन्हा नवा मुहूर्त काढला. ठाकरे सरकार हे दहा मार्चनंतर पडेल असे भाजप नेत्यांकडून सागण्यात येत आहे. मात्र चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) या विधानाची राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपाने महविकास आघाडी सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा असा टोला देसाईंनी पाटलांनी लगावला आहे. आघाडी सरकार स्थापनेपासून दोन वर्षात भाजपाने अनेक मुहूर्त सांगितले. मात्र सरकार इंचभरही हलले नाही आणि येथून पुढेही हलणार नसल्याचा विश्वास शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. तसेच सेना आमदारांनी निधी वितरणाबाबत अजित पवार यांची तक्रार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली. याबाबत शंभूराज देसाई यांना विचारले असता याबाबत मला कल्पना नाही. मात्र निधी वितरणाबाबत सेना आमदारांची काही भूमिका असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन ही बाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निदर्शनास आणून देवू अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली आहे.
सोमय्यांच्या आरोपावर गृहराज्यमंत्र्यांचं उत्तर
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या जास्त आक्रमक झाले आहेत. ते महाविकास आघाडीतील नेत्यांवर अनेक आरोप करत आहेत. त्यावर बोलताना किरीट सोमय्या हे दररोज नवनवीन आरोप करत असतात. त्यांच्या आरोपांना किती महत्व द्यायचं हे माध्यमांनी ठरवावं. त्यांनी याविषयी कुठेही तक्रार करावी. सर्व निर्णय पारदर्शक झालेले आहेत. असे म्हणत त्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा निर्वाळा शंभूराज देसाई यांनी दिला. पुण्यात किरीट सोमय्यांना पालिकेच्या ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली होती. त्याच पायऱ्यावर भाजपकडून किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला आहे.
निर्बंधात शिथिलता देण्यात यावी
गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोविड महामारीच्या अनुषंगाने विविध धार्मिक, राजकीय उत्सव यावर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी करण्यात आल्याने तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यामध्ये यश आले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवार 19 फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्याकरीता राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी. अशी आग्रही विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेकडे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी लेखी पत्राव्दारे केली आहे. अशीही माहिती त्यांनी दिली.