दिनकर थोरात, प्रतिनिधी, सातारा : कराड ते सातारा अशी चार दिवस झालेल्या शेतकरी पदयात्रेत पालक मंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी काही सोय केली नाही. कालच्या समारोप सभेत प्रवीण दरेकर, सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली होती. सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे हे माहीत नाही. मात्र तो भाग्यवान माणूस आहे हेसुद्धा माहीत नाही. शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला. मात्र पालकमंत्री यांनी साधा एक फोन केला नाही. आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही. एक अॅब्युलन्स दिली गेली नाही. याची नाराजी माझ्या मनात असल्याची भावना मंत्री महोदयांसमोर सदाभाऊ खोत यांनी बोलून दाखवली.
तसंच सत्ता भांग पिल्यासारखी असते. अंगात आले की माणूस डुलायला आणि नाचायला लागतो. मात्र नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असते, अशी जहरी टीका सुद्धा शंभुराज देसाई यांच नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी केली.
पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सदाभाऊ खोत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. सदाभाऊच भांग पित असतील. यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे. याच नशेत त्यांनी हे वक्तव्य केलंय. असा टोला शंभुराज देसाई यांनी लागवला. आम्ही आंदोलनकर्त्यांसाठी सगळी सोय केली होती. सर्व प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात आले होते, असं सुद्धा शंभुराज देसाई यांनी सांगितलंय.
सदाभाऊ खोत आणि शंभूराज देसाई यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. सत्ता ही भांग पिल्यासारखी असते. सत्ता मिळाल्यावर काही लोकं डुलायला आणि नाचायला लागतात. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी त्यांना प्रत्युतर दिलंय. त्यामुळे आता आणखी हा वाद किती वाढतो ते बघावं लागेल.