सातारा : सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या सहकाऱ्यांनी जे केलं ते योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्यांना जागा दाखवणार असल्याचा इशारा शरद पवार यांनी दिला. त्यांचा रोख हा भाजपवर विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिसला. माझा आशीर्वाद आहे, असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. माझे कार्यकर्ते हे माझ्यासोबतच आहे.
शरद पवार म्हणाले, विधिमंडळाचा प्रमुख ही संस्था आहे. त्याचे काही मर्यादा आहेत. विरोधी पक्षाचा नेता असो त्यांनी या संस्थांची प्रतिष्ठा राखली पाहिजे. सोडून गेलेल्यांवर कारवाई करणार का, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे कार्यकर्त्यांसोबत बसून निर्णय घेतील. जयंत पाटील कायद्यानुसार काम करतात. जयंत पाटील हे घटना, नियम पाहूनच काम करतात.
अशा घटना घडल्यानंतर जेव्हा निवडणूक होते तेव्हा लोकं काय निर्णय घ्यायचा ते ठरवतात. लोकांवर, मतदारांवर माझा विश्वास आहे. लोक तुम्हाला शक्ती देतात. फक्त तुम्ही त्यासंबंधी कंटाळा करू नका. तुम्ही लोकांना भेटा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचंही शरद पवार म्हणाले.
पंतप्रधानांनी जाहीर स्टेटमेंट केलं. मंत्रीपदाची शपथ दिली. सहा जणांवर उगीच अन्याय केला होता, असं मला म्हणावं लागेल. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पक्षाची बांधणी करणे म्हणजे शिवधनुष्य उचलणे नव्हे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
आमदार, खासदार हे अतिशय कष्टाने निवडून येतात. संसदेत जाण्याची संधी मिळते ते भाग्यवान आहेत. सातारा, कोल्हापूरनं राष्ट्रवादीला बळ दिलं. त्यामुळे साताऱ्यात आलो असल्याचंही शरद पवार यांनी म्हंटलं.
ज्याच्याकडे जास्त आमदार आहेत तो पक्ष विरोधी पक्षनेतेपदासाठी मागणी करू शकतो. तो नेता पदावर बसू शकतो. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षाकडे सर्वात जास्त सदस्य आहेत. त्यांचे जास्त आमदार असतील आणि विरोधी पक्षनेता या पदावर त्यांनी मागणी केली, तर ती मागणी रास्त असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवार हे कान्फिडन्ट दिसत आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, पक्षाचा नेता कान्फिडन्ट असेल, तर कार्यकर्ते डबल कान्फिडन्ट असतात.